GT vs RCB : साई सुदर्शनकडून चौकार षटकारांची आतिषबाजी, जे विराटला जमलं ते करुन दाखवलं, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत उलटफेर
Sai Sudarshan : गुजरात टायटन्सचा डाव साई सुदर्शन यानं सावरला. साई सुदर्शननं 84 धावांची खेळी केली. या जोरावर त्यानं ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठी झेप घेतली आहे.
अहमदाबाद : आयपीएलची (IPL 2024) 45 वी मॅच गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यात सुरु आहे. गुजरातमधील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच सुरु आहे. आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिसनं (Faf du Plessis) टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीच्या बॉलर्सनी पॉवरप्लेपर्यंत गुजरातच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवलं होतं.मात्र, साई सुदर्शन (Sai Sudarshan) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) या दोघांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर गुजरातनं 20 ओव्हरमध्ये 200 धावांचा टप्पा गाठला. गुजरातनं आरसीबीपुढं विजयासाठी 201 धावांचं आव्हान ठेवलं आहे. साई सुदर्शननं केलेल्या 84 आणि शाहरुख खानची 58 धावांची खेळी गुजरातसाठी महत्त्वपूर्ण ठरली.
साई सुदर्शन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी (Sai Sudarshan in Orange Cap List)
गुजरात टायटन्सचे सलामीवीर शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा आज चांगली कामगिरी करु शकले नाहीत. रिद्धिमान साहा केवळ 5 धावा करुन बाद झाला. दुसरीकडे कॅप्टन शुभमन गिलनं 16 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलच्या बॉलिंगवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. यानंतर गुजरातचा डाव साई सुदर्शन आणि शाहरुख खान यांनी सावरला. साई सुदर्शननं 49 बॉलचा सामना करताना चार षटकारांसह 8 चौकारांच्या जोरावर 84 धावांची खेळी केली आणि गुजरातचा डाव सावरला. साई सुदर्शननं 84 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठी झेप घेतली आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत साई सुदर्शननं दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील मॅचमध्ये गुजरातच्या संघाची फलंदाजी संपेपर्यंतच्या आकडेवारीनुसार विराट कोहलीच्या नावावर 430 धावांची नोंद असून तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे. साई सुदर्शननं 84 धावांची खेळी करत मोठी झेप घेत या शर्यतीत दुसरं स्थान पटकावलं. साई सुदर्शनच्या नावावर 418 धावांची नोंद आहे. तिसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन आहे. त्याच्या नावावर 385 धावांची नोंद आहे.
साई सुदर्शननं यंदाच्या आयपीएलमध्ये 135.7 च्या स्ट्राइक रेटनं आणि 46.4 च्या सरासरीनं 418 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनंतर यंदाच्या आयपीएलमध्ये चारशे धावांचा टप्पा पार करणारा साई सुदर्शन दुसरा खेळाडू ठरला आहे. साई सुदर्शनच्या नावावर यंदाच्या आयपीएलमध्ये दोन अर्धशतकांची नोंद आहे.