RR vs GT: हिशोब चुकता! गुजरातचा राजस्थानवर 9 विकेटने विजय, प्लेऑफच्या दिशेने हार्दिक अॅण्ड कंपनीचे पाऊल
IPL 2023, RR vs GT: राजस्थानने दिलेल्या 119 धावांचे माफक आव्हान गुजरातने नऊ विकेट आणि 37 चेंडू राखून सहज गाठले.
![RR vs GT: हिशोब चुकता! गुजरातचा राजस्थानवर 9 विकेटने विजय, प्लेऑफच्या दिशेने हार्दिक अॅण्ड कंपनीचे पाऊल RR vs GT IPL 2023 Match highlights Gujarat Titans Won By 9 Wickets Against Rajasthan Royals Sawai Mansingh Indoor Stadium 2023 Ipl live marathi News RR vs GT: हिशोब चुकता! गुजरातचा राजस्थानवर 9 विकेटने विजय, प्लेऑफच्या दिशेने हार्दिक अॅण्ड कंपनीचे पाऊल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/05/31037109da482c6c90bf1e087a328ffe1683306400023430_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2023, RR vs GT: आधी गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांना जेरीस आणले, त्यानंतर फलंदाजांनी राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई केली. साघिंक खेळाच्या बळावर गुजरातने राजस्थानचा नऊ विकेटने पराभव केला. या विजयासह गुजरातने पराभवाचा वचपा काढला. लीग फेरीत पहिल्या सामन्यात राजस्थानने गुजरातचा पराभव केला होता. राजस्थानने दिलेल्या 119 धावांचे माफक आव्हान गुजरातने नऊ विकेट आणि 37 चेंडू राखून सहज गाठले. गुजरातचा या स्पर्धेतील हा सातवा विजय होय. या विराट विजयासह गुजरातने प्लेऑफच्या दिशेन पाऊल टाकलेय.
119 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या शुभमन गिल आणि वृद्धीमान साहा यांनी दमदार सुरुवात दिली. पहिल्या तीन षटकात गिल-साहा जोडीने सावध फलंदाजी केली. त्यानंतर आक्रमक रुप घेत गुजरातची धावसंख्या वाढवली. गुजरातने पावरप्लेमध्ये बिनबाद 49 धावा चोपल्या होत्या. इथेच गुजरातचा विजय निश्चित झाला होता. साहा आणि गिल यांनी ताबोडतोड धावा करत गुजरातच्या धावसंख्येला आकार दिला. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 71 धावांची भागिदारी केली. शुभमन गिल याला चहल याने बाद करत राजस्थानला पहिले यश मिळवून दिले.. पण तोपर्यंत उशीर झाला होता.
शुभमन गिल बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या याने गुजरातची धावसंख्या वेगाने वाढवली. साहा याच्या मदतीने हार्दिक पांड्या याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. हार्दिक पांड्याने आक्रमक फलंदाजी करत राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. हार्दिक पांड्याने अवघ्या 15 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 39 धावांची खेळी केली. तर वृद्धीमान साहा याने नाबाद 41 धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून चहल याने एकमेव विकेट घेतली.
राशिद खान आणि नूर अहमदचा भेदक मारा, राजस्थानची 118 धावांपर्यंत मजल
राशिद खान आणि नूर अहमद यांच्या गोलंदाजीसमोर राजस्थानच्या फंलदाजांची दमछाक उडाली. राजस्थानला 20 षटके फलंदाजीही करता आली नाही. गुजरातच्या भेदक माऱ्यासमोर राजस्थानचा डाव 17.5 षटकात 118 धावांत संपुष्टात आला. गुजरातच्या गोलंदाजांनी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर हल्लाबोल केला. राशिद खान आणि नूर अहमद या अफगाण गोलंदाजीसमोर राजस्थानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. राशिद खान आणि नूर अहमद यांनी पाच विकेट घेतल्या, त्यामुळेच राजस्थानचा डाव 118 धावांवर संपुष्टात आला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानची सुरुवात खराब झाली. आक्रमक जोस बटलर अवघ्या आठ धावांवर तंबूत परतला. तर मागील सामन्यातील शतकवीर यशस्वी जयस्वाल धावबाद झाला. यशस्वीने 11 चेंडूत 14 धावांचे योगदान दिले. यामध्ये एक चौकार आणि एक षटकार लगावला. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसन याने 20 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले. संजू सॅमसन याने राजस्थानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. गुजरातच्या गोलंदाजीपुढे राजस्थानच्या फंलदाजांनी नांगी टाकली. एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. संजू सॅमसन याच्यानंतर देवदत्त पडिक्कल यानेही विकेट फेकली. पडिक्कल याने १२ धावांचे योगदान दिले. आर अश्विन याला दोन धावांवर राशिद खान याने तंबूत पाठवले. तर रियान पराग याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवले.. पण पराग इम्पॅक्ट पाडण्यात अपयशी ठरला. राशिद कान याने रियान पराग याला चार धावांवर तंबूत धाडले.
लागोपाठ विकेट पडल्यामुळे राजस्थानचा डाव अडचणीत सापडला होता. शिमोरन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांनी राजस्थानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण राशिद खान याने शिमरोन हेटमायर याला सात धावांवर बाद केले तर ध्रुव जुरेल याला 9 धावांवर नूर अहमद याने तंबूत पाठवले. 100 धावांच्या आत राजस्थानचे आठ फलंदाज तंबूत परतले होते. राजस्थानचा संघ सन्मानजनक धावसंख्या उभारणार का? असा प्रश्न पडला होता. पण ट्रेंट बोल्ट याने निर्णायाक फलंदाजी करत राजस्थानची धावसंख्या 110 च्या पुढे नेहली. ट्रेंट बोल्ट याने 11 चेंडूत 15 धावांचे योगदान दिले. यामध्ये एक षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. संजू सॅमसन याच्यानंतर सर्वाधिक धावा ट्रेंट बोल्ट याने केल्या आहेत. अॅडम झम्पा याने सात धावांची खेळी केली. तर संदीप शर्मा दोन दावांवर नाबाद राहिला.
गुजरातची भेदक गोलंदाजी -
गुजरातच्या गोलंदाजांनी पहिल्यापासूनच भेदक मारा केला. शमी, हार्दिक पांड्या आणि लिटल यांनी वेगवान माऱ्याची धुरा सांभाळली. राशिद खान आणि नूर अहमद यांनी अचूक टप्प्यावर मारा करत राजस्थानच्या फलंदाजांना तंबूत धाडले. नूर अहमद आणि राशिद खान यांनी राजस्थानच्या मध्यक्रम तंबूत धाडला. दोघांनी पाच फलंदाजांना बाद केले. राशिद कान याने चार षटकात अवघ्या 14 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तर नूर अहमदन याने तीन षटकात दोन फलंदाजांना बाद केले. आर. अश्विन, रियान पराग आणि शिमरोन हेटमायर यांना राशिद खान याने तंबूत पाठवले. तर नूर अहमद याने ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांना बाद केले. हार्दिक पांड्या, जोश लिटिल आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. राजस्थानचे दोन फलंदाज धावबाद झाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)