(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Indians: मुंबई इंडियन्समध्ये नेमकं काय घडतंय? हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वशैलीवर प्रश्न, सीनियर खेळाडू स्पष्टच बोलले
Mumbai Indians :आयपीएलच्या 17 व्या पर्वात प्लेऑफच्या शर्यतीतून पहिल्यांदा बाहेर पडण्याची नामुष्की मुंबई इंडियन्सवर ओढवली आहे.
मुंबई: आयपीएलच्या 2024 च्या (IPL 2024) पर्वात मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक ठरली आहे. मुंबई इंडियन्सनं 2020 नंतरचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) नेतृत्त्वाची धुरा सोपवली होती. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत 12 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये मुबई इंडियन्सला 12 पैकी 8 मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईनं केवळ 4 मॅचमध्ये विजय मिळवता आलेला आहे. मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये काही आलबेल नसल्याचं समोर आलं होतं. मुंबई इंडियन्समध्ये दोन गट असल्याच्या चर्चा सुरु होत्या. इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार मुंबई इंडियन्सच्या संघातील सीनियर खेळाडूंनी हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाबद्दल प्रश्न उपस्थित केल्याचं समोर आलं आहे.
मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सच्या महत्त्वाच्या खेळाडूंनी कोचिंग स्टाफनं ड्रेसिंग रुममध्ये फार चर्चा होत नसल्याचं म्हटलंय. यासाठी हार्दिक पांड्याची नेतृत्त्वशैली त्यांनी कारणीभूत ठरवली आहे.
इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीनुसार मुंबई इंडियन्सचे काही खेळाडू आणि कोचिंग स्टाफ एका मॅचनंतर भेटले होते. या बैठकीत मुंबई इंडियन्सचे काही जुने खेळाडू असल्याचं वृत्त आहे. यामध्ये रोहित शर्मा,सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश असल्याचं त्या बातमीमध्ये म्हटलंय. या खेळाडूंनी जेवणादरम्यान त्यांची भूमिका मांडली. टीमची कामगिरी चांगली होत नसल्याबाबतच्या कारणांकडे त्यांनी लक्ष वेधलं. यानंतर त्या खेळाडूंची मुंबई इंडियन्सचे वरिष्ठ आणि टीम मॅनेजमेंटच्या प्रतिनिधींशी देखील त्यांची चर्चा झाल्याची माहिती आहे.
तिलक वर्मा प्रकरण
हार्दिक पांड्यानं दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्य पराभवाला तिलक वर्माला जबाबदार धरलं होतं. खरंतर तिलक वर्मानं त्या मॅचमध्ये मुंबईकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. अक्षर पटेल बॉलिंग करत असताना तिलक वर्मानं त्याच्या विरुद्ध आक्रमक फलंदाजी करण्याची गरज होती, असं हार्दिक पांड्या म्हणाला होता. मॅचमधील पराभवाला एका खेळाडूला जबाबदार धरणं देखील योग्य नव्हतं अशी भूमिका मांडली गेल्याचं कळतंय.
हार्दिक पांड्याला टीम मॅनेजमेंटची भक्कम साथ
दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईचा संघ ज्या स्थितीतून जातोय ते काही नेतृत्त्वाचं संकट नाही. जी टीम गेल्या 10 वर्षांपासून रोहित शर्माच्या नेतृत्त्वात खेळत होती ती आता नव्या कॅप्टनसह परिवर्तन करुन ताळमेळ बसवत असल्याचं त्या अधिकाऱ्यानं सांगितलं. ज्या टीम नेतृत्त्व परिवर्तन करतात त्यांना सुरुवातीला समस्या येतात, खेळात असं नेहमी होत राहतं, असं देखील ते म्हणाले.
संबंधित बातम्या :