हार्दिक पांड्यावर नामुष्की, मुंबईचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात, कोलकात्याचा 24 धावांनी विजय
Mumbai Indians playoff : आयपीएल 2024 मधील मुंबईचं आव्हान संपुष्टात आले आहे. मुंबई इंडियन्सचा 11 सामन्यातील आठवा पराभव झाला आहे.
Mumbai Indians playoff : आयपीएल 2024 मधील मुंबईचं आव्हान संपुष्टात आले आहे. मुंबई इंडियन्सचा 11 सामन्यातील आठवा पराभव झाला आहे. करो या मरोच्या सामन्यात कोलकात्यानं मुंबईचा 24 धावांनी पराभव केला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईला यंदाच्या हंगामात लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. यंदाच्या हंगामात आव्हान संपणारा मुंबईचा पहिलाच संघ ठरला आहे. कोलकात्यानं दिलेल्या 170 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 145 धावाच करता आल्या.
यंदाच्या हंगामातील मुंबईची कामगिरी कशी झाली ?
24 मार्च 2024 -
मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात टायटन्सने मुंबईचा सहा धावांनी पराभव केला. गुजरातने पहिल्यांदा फलंदाजी करताना 168 धावा केल्या, प्रत्युत्तरात मुंबईला फक्त 162 धावा करता आल्या.
27 मार्च 2024 -
सनरायजर्स हैदराबादने मुंबईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. हैदराबादने प्रथम फलंदाजी कराताना 277 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरदाखल मुंबईचा संघ 246 धावांपर्यंत मजल मारु शकला. हैदराबादने मुंबईचा 31 धावांनी पराभव केला.
1 एप्रिल 2024 -
मुंबईचा सलग तिसरा पराभव झाला. राजस्थान रॉयल्सने मुंबईला 6 विकेटने पराभूत केले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 125 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल राजस्थानने हे आव्हान सहा चार विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले.
7 एप्रिल 2024 -
मुंबई इंडियन्सनं तीन पराभवानंतर पहिल्या विजयाची नोंद केली. मुंबईने दिल्लीचा 29 धावांनी पराभव केला. मुंबईने प्रथम फंलदाजी करताना 234 धावांचा पाऊस पाडला. दिल्लीनं 205 धावांपर्यंत मजल मारली.
11 एप्रिल 2024 -
मुंबईने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. मुंबईने आरसीबीचा सात विकेटने पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 196 धावा केल्या. मुंबईने हे आव्हान तीन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले.
14 एप्रिल 2024 -
चेन्नईने मुंबईचा वानखेडेवर पराभव केला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 206 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल मुंबईचा संघ 186 धावाच करु शकला. चेन्नईने मुंबईचा वानखेडेवर 20 धावांनी पराभव केला. धोनीनं हार्दिक पांड्याच्या अखेरच्या चार चेंडूवर 20 धावा चोपल्या होत्या. याच फरकाने मुंबईचा पराभव झाला.
18 एप्रिल 2024 -
मुंबई इंडियन्सनं पंजाब किंग्सचा नऊ धावांनी पराभव केला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 192 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल पंजाबचा डाव 183 धावांवर संपुष्टात आला.
22 एप्रिल 2024 -
राजस्थान रॉयल्सनं यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा मुंबईचा पराभव केला. राजस्थानने मुंबईचा 9 विकेटने पराभव केला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 179 धावा केल्या होत्या. राजस्थानने हे आव्हान 9 विकेट राखून सहज पार केले.
27 एप्रिल 2024 -
दिल्ली कॅपिटल्सने पराभवाचा वचपा काढला. दिल्लीने मुंबईचा दहा धावांनी पराभव केला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 257 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल मुंबईचा संघ 247 धावांपर्यंत पोहचला.
30 एप्रिल 2024 -
लखनौ सुपर जायंट्सने मुंबईचा चार विकेटने पराभव केला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 144 धावा केल्या, प्रत्युत्तरदाखल लखनौनं हे आव्हान सहा विकेटच्या मोबदल्यात पार केले.
3 मे 2024 -
कोलकाता नाईट रायडर्सनं मुंबई इंडियन्सचा 24 धावांनी पराभव केला. कोलकात्यानं प्रथम फलंदाजी करताना 169 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल मुंबईचा संघ 145 धावांपर्यंतच मजल मारली
मुंबई इंडियन्सचे उर्वरित सामने -
6 मे 2024 -
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराजयर्स हैदराबाद - वानखेडे स्टेडियम
11 मे 2024 -
कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, ईडन गार्डन
17 मे 2024 -
मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी - वानखेडे स्टेडियम