WPL: 86 बॉल्स, 159 रन्स.... मुंबई इंडियन्ससमोर RCB चीतपट, सलग दुसऱ्या सामन्यात पराभव
WPL 2023, MI vs RCB : महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये मुंबई इंडियन्स (MI) ची विजयी मोहीम सुरूच आहे. सोमवारी (6 मार्च) ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) 9 गडी राखून पराभव केला.
WPL 2023, MI vs RCB : महिला प्रीमियर लीगच्या (Women's Premier League) एका सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर (Royal Challengers Bangalore) नऊ गडी राखून विजय मिळवला. मुंबई इंडियन्सच्या विजयाची मानकरी हेली मॅथ्यूज (Hayley Matthews) ठरली. वुमेन्स प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं गुजरात जायंट्सचा (Gujarat Giants) 143 धावांनी पराभव केला होता.
महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये मुंबई इंडियन्स (MI) ची विजयी मोहीम सुरूच आहे. सोमवारी (6 मार्च) ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) 9 गडी राखून पराभव केला. रॉयल चॅलेंजर्सनं विजयासाठी 155 धावांचं लक्ष्य दिलं होतं, जे मुंबई इंडियन्स संघानं 34 चेंडू बाकी असताना पूर्ण केले.
मॅथ्यूज-ब्रंट समोर आरसीबी चीतपट
बंगळुरूनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली. यास्तिका भाटियासह हेली मॅथ्यूजनं पहिल्या विकेटसाठी 5 षटकांत 45 धावांची भागीदारी केली. यास्तिका भाटियानं प्रिती बोसच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू होण्यापूर्वी चार चौकारांच्या मदतीनं 23 धावा केल्या. एक विकेट पडल्यानंतर, आरसीबीच्या चाहत्यांना आशा होती की, त्यांचा संघ पुनरागमन करू शकेल, परंतु हेली मॅथ्यूज आणि नॅट सायव्हर-ब्रंट ही जोडी आरसीबीच्या गोलंदाजांवर तुटून पडल्यानं तसं झालं नाही.
दोन्ही खेळाडूंनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत सामना एकतर्फी केला. याचा परिणाम म्हणून मुंबई इंडियन्सनं 86 चेंडूत 159 धावा करून सामना जिंकला. वेस्ट इंडिजचा कर्णधार हेली मॅथ्यूजनं 38 चेंडूंत नाबाद 77 धावा केल्या, ज्यात 13 चौकार आणि 1 षटकार होता. तसेच इंग्लिश खेळाडू नॅट सिव्हर-ब्रंटनं 29 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. नॅट सायव्हर-ब्रंटनं आपल्या स्फोटक खेळीत नऊ चौकार आणि एक षटकार लगावला. सिव्हर-ब्रंट आणि मॅथ्यूज यांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 114 धावांची भागीदारी केली.
आरसीबीनं विकेट्स गमावल्या
नाणेफेक जिंकून सर्वात आधी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला आरसीबीचा संपूर्ण संघ 18.4 षटकांत 155 धावांवर गारद झाला. कर्णधार स्मृती मानधना आणि सोफी डिव्हाईन (16 धावा) यांनी आरसीबीला दणका दिला आणि दोघांनी पहिल्या विकेटसाठी 39 धावा केल्या. मात्र यानंतर आरसीबीचा वेग कमी झाला आणि त्यानंतर त्यांनी सलग विकेट्स गमावल्या. विकेटकीपर रिचा घोषनं सर्वाधिक 28 धावांची खेळी केली. तर स्मृती मानधना आणि श्रेयंका पाटील यांनी 23-23 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून हेली मॅथ्यूजनं सर्वाधिक तीन बळी घेतले, तर एमिलिया केर आणि सायका इशाकनं प्रत्येकी दोन बळी घेतले.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा विजय आहे. विशेष म्हणजे, पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं गुजरात जायंट्सचा 143 धावांनी पराभव केला होता. महिला टी-20 क्रिकेटमधील धावांच्या बाबतीतही हा सर्वात मोठा विजय होता. दुसरीकडे, आरसीबीचा हा सलग दुसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यात आरसीबीला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 60 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. आता 8 मार्च रोजी आरसीबीचा पुढील सामना गुजरात जायंट्सशी होणार आहे. तर मुंबई इंडियन्सचा सामना 9 मार्चला दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.