पंजाबच्या 'किंग्स'वर लखनौचे नवाब पडले भारी, पंजाबचा 20 धावांनी पराभव
IPL 2022 Marathi News : राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघाने पंजाबचा 20 धावांनी पराभव केला आहे. लखनौने दिलेले 154 धावांचे आव्हान पार करताना पंजाबचा संघ 20 षटकांत 133 धावांपर्यंत पोहचू शकला.
IPL 2022 Marathi News : राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघाने पंजाबचा 20 धावांनी पराभव केला आहे. लखनौने दिलेले 154 धावांचे आव्हान पार करताना पंजाबचा संघ 20 षटकांत 133 धावांपर्यंत पोहचू शकला. जॉनी बेयस्टोचा अपवाद वगळता पंजाबच्या एकाही फलंदाला 30 पेक्षा जास्त धावा काढता आल्या नाहीत. लखनौकडून युवा मोहसीन खान याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
153 धावांचा बचाव करताना लखनौच्या गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा केला. लखनौच्या भेदक माऱ्यापुढे पंजाबची फलंदाजी ढेपाळली. कर्णधार मयांक अग्रवाल 25 आणि जॉनी बेयस्टो 32 यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात यश मिळाले नाही. शिखर धवन 5, भानुका राजपक्षे 9, लियाम लिव्हिंगस्टोन 18, जितेश शर्मा 2, रबाडा 2, राहुल चाहर 4 यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. अष्टपैलू ऋषी धवन याने अखरेच्या षटकात फटकेबाजी करत 21 धावांची खेळी केली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. लखनौकडून मोहसीन खान सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय दुष्मंता चामिरा आणि क्रृणाल पांड्या यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. रवी बिश्नोईला एक विकेट मिळाली.
दरम्यान, कगिसो रबाडा आणि राहुल चाहरच्या माऱ्यापुढे बलाढ्य लखनौची भंबेरी उडाली. पंजाबच्या भेदक माऱ्यापुढे लखनौने निर्धारित 20 षटकात आठ बाद 153 धावा केल्या. लखनौकडून क्विंटन डिकॉक याने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. तर पंजाबकडून कगिसो रबाडाने चार गड्यांना तंबूत पाठवले.
आयपीएल 2022 मध्ये शुक्रवारी पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये यांच्यामध्ये 42 वा सामना पुण्याच्या एमसीए मैदानावर झाला. पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौ संघाची सुरुवात खराब झाली. फॉर्ममध्ये असलेला राहुल अवघ्या सहा धावांवर तंबूत परतला. त्यानंतर डिकॉक आणि दीपक हुडा यांनी डाव सावरला. पण दीपक हुडा 34 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर लखनौचे फलंदाज एकामोगाम एक बाद होत गेले. क्रृणाल पांड्या, मार्कस स्टॉयनिस, आयुष बडोनी यांना दहा धावांचा टप्पाही पार करता आला नाही. तर जेसन होल्डर 1 आणि चामिरा 17 जम बसल्यानंतर माघारी परतले. पंजाबकडून राबाडाने चार विकेट घेतल्या. तर राहुल चाहर याने दोन फलंदाजांना तंबूत धाडले. संदीप शर्माला एक विकेट मिळाली.
आवेश खानचे पुनरागमन -
पंजाब संघाने प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही. मागील सामन्यातील संघ कायम ठेवला. लखनौच्या संघात महत्वाचा बदल कऱण्यात आला. मनिष पांडेला वगळण्यात आले तर वेगवान गोलंदाज आवेश खान याने दुखापतीनंतर संघात पुनरागमन केले.