(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 : काइल मेअर्सच्या तुफानात दिल्लीच्या गोलंदाजांची दाणादाण, लखनौची 193 धावांपर्यंत मजल
LSG vs DC, IPL 2023 Live : काइल मेअर्सच्या तुफानी फटकेबाजीच्या बळावर लखनौने निर्धारित 20 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 193 धावा केल्या.
LSG vs DC, IPL 2023 Live : काइल मेअर्सच्या तुफानी फटकेबाजीच्या बळावर लखनौने निर्धारित 20 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 193 धावा केल्या. काइल मेअर्स याने 73 धावांचे योगदान दिले. तर निकोलस पूरन याने हाणामारीच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. पूरन याने 36 धावांचे इम्पॅक्टफूल योगदान दिलेय. दिल्लीकडून खल्ली अहमद याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. दिल्लीला विजयासाठी 194 धावांचे आव्हान मिळालेय.
काइल मेअर्सचे तुफान -
संथ सुरुवातीनंतर काइल मेअर्स याने आक्रमक रुप घेतले. कर्णधार माघारी परतल्यानंतरही काइल मेअर्स याने तुफानी फटकेबाजी केली. काइल मेअर्सच्या फटकेबाजीसमोर दिल्लीची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. दिपक हुड्डासोबत मेर्सने 80 धावांची भागिदारी केली. काइल मेअर्स याने अवघ्या 38 चेंडूत 73 धावांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान काइल मेअर्स याने सात गगनचुंबी षटकार लगावले. तर दोन खणखणीत चौकार मारले. काइल मेअर्स खेळत असताना लखनौ संघ आरामात 200 धावांचा पल्ला पार करेल असे वाटत होते. पण अक्षर पटेल याने काइल मेअर्स याचा अडथळा दूर केला. अक्षर पटेल याने काइल मेअर्स याला क्लीन बोल्ड केले.
राहुलचा फ्लॉप शो, हुडा-स्टॉयनिसची संथ खेळी -
मागील काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असणारा राहुल आयपीएलच्या पहिल्या सामन्यात अपयशी ठरला. राहुल याला दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. राहुल याने 12 चेंडूत फक्त आठ धावा केल्या. या खेळीदरम्यान राहुलने एक षटकार मारला. राहुलला मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याशिवाय दीपक हुड्डा आणि मार्कस स्टॉयनिस यांनी संथ खेळी केली. स्टॉयनिस याने दहा चेंडूत फक्त 12 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने एक षटकार लगावला. तर दीपक हुड्डा याने 18 चेंडूत 17 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याला एकही चौकार अथवा षटकार लगावता आला नाही. क्रृणाल पांड्याला अखेरच्या षटकात धावा काढण्यात अपयश आले. पांड्याने 13 चेंडूत नाबाद 15 धावा केल्या.
निकोलस पूरनची फटकेबाजी, बडोनीचा फिनिशिंग टच -
काइल मेअर्स बाद झाल्यानंतर दिल्लीने एकापाठोपाठ एक विकेट गमावल्या होत्या, त्यामुळे धावसंख्या मंदावली होती. त्यावेळी निकोलस पूरन याने फटकेबाजी केली. पूरन याने अखेरच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. पूरन याने 21 चेंडूत 36 धावंची खेळी केली. या खेळीदरम्यान पूरन याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. निकोलस पूरन बाद झाल्यानंतर युवा आयुष बडोनी याने फटकेबाजी केली. अखेरच्या षटकात बडोनीने धावांचा पाऊस पाडला. बडोनीने सात चेंडूत दोन षटकार आणि एका चौकारासह 18 धावा केल्या. क्रृष्णाप्पा गौतम याने अखेरच्या चेंडूवर षटकार लगावला.
खलील अहमद सर्वात यशस्वी -
खलील अहमद याने अचूक टप्प्यावर मारा केला. त्याने लखनौची धावसंख्या रोखलीच त्याशिवाय त्याने विकेटही घेतल्या. खलील अहमद याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. खलीलने चार षटकात 30 धावा खर्च केल्या. मुकेश कुमार याने चार षटकात 34 धावा खर्च केल्या.. त्याला एकही विकेट मिळाली. चेतन सकारिया यालाही दोन विकेट मिळाल्या पण त्याला धावा रोखण्यात अपयश आले.
दिल्लीच्या फिरकीपटूची कामगिरी कशी ?
कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या दिल्लीच्या फिरकी जोडगोळीला लखनौच्या धावसंख्येला लगाम लावण्यात अपयश आले. अक्षर पटेल याने 9.50 प्रतिषटक धावा दिल्या तर कुलदीपने 8.75 प्रतिषटक धावा दिल्या. अक्षर पटेल याने चार षटकात एक विकेट घेत 38 धावा दिल्या. तर कुलदीप यादव याने चार षटकात 35 धावा देत एक विकेट घेतल्या.