(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
LSG vs CSK, IPL 2024 : रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक आणि धोनीच्या फिनिशिंगच्या जोरावर चेन्नईने 20 षटकात 6 विकेटच्या मोबदल्यात 176 धावांचा डोंगर उभारला.
LSG vs CSK, IPL 2024 : रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक आणि धोनीच्या (MS Dhoni) फिनिशिंगच्या जोरावर चेन्नईने 20 षटकात 6 विकेटच्या मोबदल्यात 176 धावांचा डोंगर उभारला. रवींद्र जाडेजानं (Ravindra Jadeja) मोक्याच्या क्षणी 57 धावांची खेळी केली. तर धोनीनं 9 चेंडूमध्ये 28 धावा चोपल्या. लखनौकडून कृणाल पांड्या सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. क्रृणाल पांड्यानं 3 षटकात 16 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. मोहसीन खान, यश ठाकूर, रवि बिश्नोई आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतल्या. लखनौला विजयासाठी 20 षटकात 177 धावांचे आव्हान आहे.
जड्डूचं अर्धशतक -
चेन्नईची फलंदाजी ढेपाळल्यानंतर रवींद्र जाडेजाला बढती देण्यात आली. जाडेजानं सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. एकेरी - दुहेरी धावसंख्यावर भर दिला. जम बसल्यानंतर रवींद्र जाडेजानं शानदार अर्धशतक ठोकलं. रवींद्र जाडेजानं मोईन अली आणि एमएस धोनी यांच्यासोबत निर्णायाक भागिदारी केली. रवींद्र जाडेजानं 40 चेंडूमध्ये 57 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये रवींद्र जाडेजाने एक षटकार आणि पाच चौकार लगावले.
धोनीचा फिनिशिंग टच -
धोनीनं पुन्हा एकदा शानदार फिनिशिंग केली. मुंबईविरोधात धोनीनं चार चेंडूमध्ये निर्णायक 20 धावा चोपल्या होत्या. आजही धोनीने निर्णायाक फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडला. धोनीने 311 च्या स्ट्राईक रेटने अखेरच्या दोन षटकात धावांचा पाऊस पाडला. धोनीने फक्त 9 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये धोनीने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. धोनीने अखेरच्या चार चेंडूवर 16 धावा वसूल केल्या.
मोईन अलीची शानदार खेळी -
डॅरेल मिचेल याच्याजागी संघात स्थान मिळवणाऱ्या मोईन अली यानं शानदार खेळी केली. मोईन अली यानं रविंद्र जाडेजासोबत शानदार अर्धशतकी भागिदारी केली. मोईन अली यानं 20 चेंडूमध्ये 30 धावांचं योगदान दिलं. या खेळीमध्ये मोईन अली यानं तीन षटकार लगावले.
अजिंक्याचा लढा -
एका बाजूला ठरावीक अंतरानं विकेट पडत असताना दुसर्या टोकाला अजिंक्य रहाणे यानं लढा दिला. अजिंक्य रहाणे यानं चेन्नईची धावसंख्या हालती ठेवली. रहाणे यानं ऋतुराजच्या साथीनं डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. अजिंक्य रहाणे यानं 24 चेंडूमध्ये 36 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये अजिंक्य रहाणे यानं एक षटाकर आणि पाच चौकार ठोकले.
चेन्नईची खराब सुरुवात -
लखनौचा कर्णधार केएल राहुल यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवत चेन्नईची आघाडीची फळी तंबूत धाडली. रचिन रविंद्र याला खातेही उघडता आले नाही. त्याला मोहसीन खान यानं त्रिफाळाचीत केले. कर्णधार ऋतुराज गायकवाड यानं 13 चेंडूमध्ये एका चौकाराच्या मदतीने 17 धावांची खेळी केली. शिवम दुबे फक्त तीन धावा काढून बाद झाला. 87 धावांत चार फलंदाज बाद झाल्यानंतर चेन्नईने समीर रिझवी याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरवले. पण समीर इम्पॅक्ट पाडण्यात अपय़शी ठऱला.
LSG vs CSK Live Score : चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात कोण कोण ?
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोइन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पथिराना
इम्पॅक्ट प्लेअर - समीर रिझवी
LSG vs CSK Live Score: लखनौचे 11 शिलेदार कोणते ?
क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), दीपक हुड्डा, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, मैट हेनरी, रवि बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकुर
आणखी वाचा :