KKR vs SRH : हैदराबादसमोर कोलकात्याचं आव्हान, कोण मारणार बाजी?
KKR vs SRH IPL 2022 Preview : कोलकाता संघाचा पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या इराद्याने हैदराबादचा संघ मैदानात उतरणार आहे.
KKR vs SRH IPL 2022 Preview : मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडिअमवर कोलकाता आणि हैदराबाद यांच्यामध्ये आयपीएलचा 25 वा सामना होणार आहे. केन विल्यमसन हैदराबाद संघाचं तर श्रेयस अय्यर कोलकाता संघाचं नेतृत्व करत आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. संथ सुरुवातीनंतर हैदराबाद संघाने चेन्नई आणि गुजरात संघाविरोधात विजय मिळवला आहे. कोलकाता संघाचा पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या इराद्याने हैदराबादचा संघ मैदानात उतरणार आहे. विजयाच्या पटरीवर परतणाऱ्या हैदराबाद संघाला कोलकाताविरोधात संघात बदल करावा लागणार आहे. हैदराबादच्या वॉशिंगटन सुंदरला दुखापतीमुळे कोलकाताविरोधातील सामन्याला मुकावे लागणार आहे. वॉशिंगटन सुंदरची कमी हैदराबाद संघाला जाणवणार आहे.
गुजरातविरोधात क्षेत्ररक्षण करताना वॉशिंगटन सुंदरला दुखापत झाली. कोलकाताविरोधात वॉशिंगट सुंदरची कमी हैदराबादला नक्कीच जाणवेल. कारण सुंदरने आतापर्यंत आपल्या लौकिकास साजेशी खेळी केली आहे. सुंदरने गोलंदाजी करताना चार विकेट घेतल्या आहेत. तर फलंदाजी करताना मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी केली आहे. अब्दुल समद, श्रेयस गोपाल आणि जगदीश सुचित यांच्यापैकी एका अष्टपैलू खेळाडूला अंतिम 11 मध्ये स्थान मिळू शकते.
कोलकाता संघाला दिल्लीविरोधात पराभवाचा सामना करावा लागला होता. कोलकाता संघ विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. श्रेयस अय्यर अॅण्ड कंपनी मागील चुका सुधारुन विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरेल. दिल्लीविरोधात कोलकात्याची धारधार गोलंदाजी कमकुवत वाटत होती. फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नव्हती. अजिंक्य रहाणेचा फॉर्म केकेआरसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. पुन्हा अजिंक्य रहाणेला संधी मिळणार की? अय्यर नव्या खेळाडूला अजमावणार... हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सनराइजर्स हैदराबादचा संघ : केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, मार्करम, निकोलस पूरण, अब्दुल समद, प्रियम गर्ग, विष्णु विनोद, ग्लेन फिलिप्स, आर समर्थ, शशांक सिंह, वाशिंगटन सुंदर, रोमेरियो शेफर्ड, मार्को जेनसन, जे सुचित, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन एबॉट, कार्तिक त्यागी, सौरभ तिवारी, फजलहक फारूकी, उमरान मलिक, टी नटराजन.
कोलकाता नाइट राइडर्स : फिंच, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, प्रथम सिंह, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर(कर्णधार), अशोक शर्मा, पॅट कमिन्स, रसिक डार, शिवम मावी, टिम साउदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅक्सन.