David Miller : टी-20 वर्ल्डकप मधील सर्वात धोकादायक गोलंदाज कोण? टीम इंडियाच्या बॉलरचं नाव घेत डेविड मिलर, म्हणाला...
David Miller : दक्षिण आफ्रिकेचा आणि गुजरात टायटन्सचा खेळाडू डेविड मिलरनं टी -20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे.
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज आणि सध्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या डेविड मिलरनं (David Miller) टी-20 वर्ल्डकपबाबत मोठं भाष्य केलं. टीम इंडियाचा वेगवान बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा माझ्यासह प्रत्येक फलंदाजाला धोकादायक असल्याचं मिलरनं म्हटलं. जसप्रीत बुमराह सध्या आयपीएलमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आहे. जसप्रीत बुमराहनं 20 विकेट घेत पर्पल कॅप स्वत:कडे ठेवली आहे. जसप्रीत बुमराहनं 6.48 च्या सरासरीनं धावा देत 20 विकेट घेतल्या आहेत.
सध्या आयपीएल अंतिम टप्प्यात पोहोचलं असून क्रिकेट चाहत्यांसह खेळाडू टी-20 वर्ल्ड कपची वाट पाहत आहेत. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्याकडून संयुक्तरित्या या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. डेविड मिलर सध्या गुजरात टायटन्सकडून खेळत असला तरी तो देखील टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी उत्सुक आहे.
डेविड मिलरनं टीम इंडियाचा बॉलर जसप्रीत बुमराह हा केवळ त्याच्यासाठीचं नव्हे तर इतर सर्व फलंदाजांसाठी धोकादायक असल्याचं म्हटलंय. भारताकडे इतर अनेक चांगले खेळाडू आहेत. पण, फलंदाज म्हणून मला वाटतं की जसप्रीत बुमराह मोक्याच्या क्षणी चांगली बॉलिंग करतो. तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे.
मिलरकडून साई सुदर्शनचं कौतुक
डेविड मिलरनं जसप्रीत बुमराहसह गुजरात टायटन्सचा खेळाडू साई सुदर्शनचं देखील कौतुक केलं आहे. साई सुदर्शन हा हुशार खेळाडू आहे, त्याच्या पुढं करिअर आहे. साई सुदर्शनची बॅटिंग पाहण्याचा आनंद मिळतो. तो ज्या प्रकारे तयारी करतो ते देखील महत्त्वाचं असल्याचं मिलर म्हणाला.
टी-20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश ड गटात करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गटात नेदरलँडस, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ या संघांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेची पहिली मॅच श्रीलंकेविरोधात 3 जूनला होणार आहे.
आतापर्यंत आयसीसी वर्ल्डकप आणि इतर स्पर्धांमध्ये दक्षिण आफ्रिकेला एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही.यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात यश येतं का ते पाहावं लागेल.
दरम्यान, जसप्रीत बुमराह सोबत टीम इंडियाकडून वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग यांना संधी देण्यात आली आहे. भारतानं 2007 मध्ये पहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. मात्र,त्यानंतर एकाही टी-20 वर्ल्डकपमध्ये विजेतेपद मिळालेलं नाही. भारताचा देखील विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न असेल.
संबंधित बातम्या :
RCB Playoff : दिल्लीच्या विजयाचा फायदा आरसीबीला, पाहा प्लेऑफचं गणित