MI vs KKR : मुंबई आणि टीम इंडियाची काळजी वाढवणारी गोष्ट, रोहित शर्मा अन् हार्दिक पांड्याचा दाखला देत इरफान पठाण म्हणाला...
IPL 2024 : आयपीएलमध्ये काल झालेल्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं मुंबई इंडियन्सला 18 धावांनी पराभूत केलं. मुंबईच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यानं कोलकाताचा विजय झाला.
IPL 2024, MI vs KKR कोलकाता : कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आयपीएलमधील (IPL 2024) 60 वी मॅच पार पडली. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) पदरी पुन्हा निराशा आली. पावसामुळं उशिरा सुरु झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सला अपेक्षेप्रमाणं कामगिरी करता आली नाही. कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) पहिल्यांदा फलंदाजी करताना 16 ओव्हरमध्ये 157 धावा केल्या होत्या. तर, मुंबई इंडियन्सला 8 विकेटवर 139 धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबई इंडियन्सचा पराभव करत कोलकाता नाईट रायडर्सनं प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला. प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवणारी कोलकाता नाईट रायडर्स ही पहिली टीम ठरली आहे. मुंबईच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी हे पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण (Irfan Pathan) यानं मुंबईच्या पराभवानंतर मोठं वक्तव्य केलं आहे. इरफान पठाण यानं रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) फॉर्मविषयी भूमिका मांडली.
इरफान पठाण काय म्हणाला? (Irfan Pathan)
इरफान पठाण यानं मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाची काळजी वाढवणारी गोष्ट सांगितली आहे. हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा या दोघांचा फॉर्म मुंबई आणि टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. ते दोघेही लवकरच कमबॅक करु शकतात, अशी आशा करु या, असं इरफान पठाण यानं म्हटलं. आगामी टी-20 वर्ल्ड कपपूर्वी रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांचा आयपीएलमधील फॉर्म चिंतेचा विषय ठरतोय. याकडेच इरफान पठाण यानं लक्ष वेधलंय.
इरफान पठाणचं ट्विट
Hardik Pandya and Rohit Sharma’s form is a big worry for Mumbai and Indians. You hope that they come back to form quickly.
— Irfan Pathan (@IrfanPathan) May 11, 2024
मुंबईचा नववा पराभव
मुंबईच्या पराभवाला फलंदाजांची निराशाजनक कामगिरी कारणीभूत ठरली. रोहित शर्मा आणि ईशान किशननं डावाची सुरुवात चांगली केली. मात्र, त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आलं. रोहित शर्मा आणि ईशान किशन बाद झाल्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी नियमित अंतरानं विकेट गमावल्या आणि हाती असलेली मॅच देखील हातून निसटली. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेला पराभव हा मुंबई इंडियन्सचा यंदाच्या आयपीएलमधील नववा पराभव ठरला. तर, कोलकाता नाईट रायडर्सनं मुंबईला पराभूत करत प्लेऑफमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.
दरम्यान, पाचवेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला गेल्या सलग चार आयपीएलमध्ये यश मिळालेलं नाही. मुंबई इंडियन्सं विजेतेपदाच्या दृष्टीनं वाटचाल करण्यासाठी कॅप्टन देखील बदलला होता. मात्र, त्यांना यश आलं नाही. मुंबईचं नेतृत्त्व सध्या हार्दिक पांड्या करतोय.
संंबंधित बातम्या :
KKR vs MI live Score IPL 2024: कोलकाता नाइट रायडर्सचा 18 धावांनी विजय, मुंबई इंडियन्सला नमवले
IPL 2024: KKR vs MI: मुंबई इंडियन्सविरुद्ध कोलकाता नाइट रायडर्सचा 18 धावांनी विजय