MI vs RCB Hardik Pandya and Rohit Sharma: रोहित शर्माला जमत नसेल तर... वानखेडेवरील 'फ्लॉप शो'नंतर रवी शास्त्रींनी हिटमॅनला झापलं
MI vs RCB: तब्बल 10 वर्षांनी मुंबई इंडियन्सला आरसीबीने त्यांच्या घरच्या मैदानावर पराभवाची धूळ चारली. रोहित शर्माला धावा करण्यात येत असलेले अपयश मुंबईसाठी चिंता वाढवणारे आहे.

MI vs RCB: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांमध्ये एकदाही चमकदार कामगिरी करता आलेली नाही. काल वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) फॉर्ममध्ये येईल, अशी आशा त्याच्या चाहत्यांना होती. मात्र, सुरुवातीला दोन-तीन चांगले फटके खेळल्यानंतर रोहित शर्मा बाद झाला होता. त्याने फक्त 17 धावा केल्या. यामुळे पॉवर प्लेच्या षटकांमध्ये मुंबई इंडियन्सला अपेक्षित धावा करता आल्या नाहीत, त्याचा फटका शेवटच्या षटकांमध्ये रन चेस करताना बसला. यानंतर भारतीय संघाच माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shashtri) यांनी रोहित शर्मा याच्यावर टीकेची तोफ डागली आहे.
रवी शास्त्री यांनी रोहित शर्माच्या फलंदाजाबाबत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सला सुरुवातीला फक्त 12-15 धावांच्या छोट्या खेळीची अपेक्षा नाही. संघाला रोहित शर्माकडून अधिक धावांची अपेक्षा आहे. त्यामुळे रोहित शर्मा याला जमत नसेल तर त्याने हळू सुरूवात करावी, असे रवी शास्त्री म्हणाले.
तुमच्या खेळात सातत्य हवे. ज्या संघामध्ये खूप पुढे जाण्याची क्षमता असते त्यांच्याकडे टॉप ऑर्डरचे चांगले फलंदाज असतात. रोहित शर्मा याने 15 ते 20 धावा करुन चालणार नाही. त्याचे रुपांतर 40 ते 60 धावांच्या खेळीत झाले पाहिजे, असे रवी शास्त्री यांनी म्हटले. वानखेडे स्टेडिअमवरील सामन्यात बंगळुरुच्या संघाने मुंबईचा 12 धावांनी पराभव केला. आरसीबीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 222 धावांचा डोंगर उभा केला. मात्र, मुंबईच्या संघाला 209 धावाच करता आल्या.
रोहित शर्मा संघाच्या कॉम्बिनेशमध्ये ठरतोय अडथळा?
कालच्या सामन्यानंतर हार्दिक पांड्या याने मुंबई इंडियन्सच्या संघातील कॉम्बिनेशनसंदर्भात भाष्य केले. हार्दिक म्हणाला की, फक्त गेल्या सामन्यामध्ये रो (रोहित) उपलब्ध नव्हता. त्यामुळे आम्हाला कोणाला तर वरच्या फळीत आणणे गरजेचे होते. हा खेळाडू रोहित शर्मासारखा मल्टी डायमेन्शनल असेल जो त्याच्यासारखा डेथ ओव्हर्समध्येही खेळेल आणि वर येऊ शकेल, असे आम्हाला वाटत होते. त्यासाठी आम्ही नमन धीरला वर आणले. पण आम्हाला माहिती होते की एकदा रोहित परत आला तर नमनला पुन्हा खाली जावे लागेल, असे हार्दिक पांड्याने म्हटले. त्यामुळे रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सच्या संघावर ओझे झाला आहे का, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.
आणखी वाचा




















