IPL 2024: इंग्लंडचे खेळाडू आयपीएलमधील प्ले ऑफच्या फेरीत खेळणार की मायदेशी परतणार?; पाकिस्तानमुळे टांगती तलवार
IPL 2024: आयपीएल 2024 च्या हंगामातील प्ले ऑफच्या फेरीत इंग्लंडचे खेळाडू उपलब्ध नसणार, अशी माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डकडून आली होती.
IPL 2024 PlayOffs: आयपीएल 2024 च्या हंगामातील प्ले ऑफच्या फेरीत इंग्लंडचे खेळाडू उपलब्ध नसणार, अशी माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डकडून आली होती. कारण 1 जूनपासून सुरु होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वी इंग्लंडला पाकिस्तानसोबत टी-20 मालिका खेळायची आहे. त्यामुळे राजस्थानचा जॉस बटलर, कोलकाताचा फिल सॉल्ट, बंगळुरुचा विल जॅक्स यांच्यासह अनेक खेळाडू आयपीएलमधील प्ले ऑफच्या फेरीसाठी उपलब्ध नसणार अशी माहिती मिळत होती. मात्र याबाबत आता नवीन अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड यांच्यात आयपीएल 2024 च्या प्ले ऑफच्या टप्प्याबाबत चर्चा सुरू आहे. इंग्लंडचे क्रिकेटपटू प्ले ऑफसाठी उपलब्ध होतील की नाही हे अद्याप ठरलेले नाही. अहवालात असे म्हटले आहे की महत्त्वपूर्ण टप्प्यात प्रवेश केल्यानंतर, कोणतीही फ्रेंचायझी खेळाडूंना सोडू इच्छित नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये चर्चा सुरू आहे. हंगामाच्या मध्यावर स्पर्धा सोडल्यास खेळाडूंना परिणाम भोगावे लागू शकतात, असेही सांगण्यात आले आहे.
पाकिस्तानविरुद्ध होणार आहे मालिका-
इंग्लंड आणि पाकिस्तान संघ 22 मे ते 30 मे दरम्यान 4 टी-20 सामने खेळणार आहेत. त्यामुळे प्लेऑफमध्ये खेळण्याच्या इंग्लंडच्या खेळाडूंच्या आशा धोक्यात आल्या होत्या. जर समस्या सोडवता आली नाही तर आयपीएल प्लेऑफपूर्वी, जॉस बटलर, फिल सॉल्ट, मोईन अली, विल जॅक्स, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि रीस टोपले हे देखील आपापल्या आयपीएल संघ सोडून मायदेशी परतू शकतात. आयपीएल 2024 च्या लीग टप्प्यातील शेवटचा सामना 19 मे रोजी खेळवला जाईल. प्लेऑफचा टप्पा 21 मेपासून सुरू होणार आहे. IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये कोणते संघ पोहोचतील हे अद्याप ठरलेले नाही. विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंड 4 जून रोजी स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
गुणतालिकेची काय स्थिती?
आयपीएलतच्या गुणतालिकेत कोलकाताचा संघ पहिल्या स्थानावर आहे. कोलकाताचे सध्या 16 गुण आहेत. तर राजस्थानचा संघही 16 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून हैदराबादचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. लखनौचा 12 गुणांसह पाचव्या क्रमांकावर, दिल्ली 10 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. बंगळुरु 8 गुणांसह सातव्या क्रमांकावर असून बंगळुरुने 11 सामन्यात 4 विजय मिळवले आहेत. तर पंजाबचा संघ आठव्या स्थानावर, गुजरातचा संघ नवव्या क्रमांकावर आणि मुंबईचा संघ दहाव्या स्थानावर आहे.