Shreyas Iyer : राजस्थानकडून पराभव, हातातली मॅच निसटली, श्रेयस अय्यरला दुसरा धक्का, आयपीएलनं ठोठावला लाखोंचा दंड
IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन श्रेयस अय्यरला आणखी एक धक्का बसला आहे. आयपीएलकडून शिस्तभंग प्रकरणी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कोलकाता : आयपीएलच्या (IPL 2024) 17 व्या पर्वातील 31 व्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) अखेरच्या बॉलवर कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) पराभूत केलं. राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसननं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाताचा सलामीवीर सुनील नरेन याच्या शतकी खेळीच्या जोरावर त्यांनी 6 विकेटवर 223 धावा केल्या. कोलकातानं दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग राजस्थाननं यशस्वीपणे केला. राजस्थान रॉयल्सनं 2 विकेटनं मॅच जिंकली. राजस्थानचा सलामीवर जोस बटलर या मॅचचा हिरो ठरला. 223 धावा करुनही त्याचा बचाव न करु शकलेल्या श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) आणखी दणका बसला आहे. आयपीएलच्या मॅनेजमेंटनं श्रेयस अय्यरला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आयपीएलनं का केली कारवाई?
कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन श्रेयस अय्यर याच्यावर आयपीएल मॅनेजमेंटनं स्लो ओव्हर रेटमुळं कारवाई केली. ईडन गार्डन्सवर झालेल्या मॅचमध्ये ओव्हर रेटची गती कमी असल्यानं श्रेयस अय्यरवर कारवाई करण्यात आली आहे. आयपीएलच्या व्यवस्थापनानं श्रेयस अय्यरला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. कोलकाता नाईट रायडर्संकडून ही चूक पहिल्यांदा झाल्यानं श्रेयस अय्यरला 12 लाखांचा दंड करण्यात आला.
कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन श्रेयस अय्यर याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असला तरी त्याच्याअगोदर इतर दोन कॅप्टनला देखील दंड करण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंतला दोनवेळा स्लो ओव्हर रेटप्रश्नी दंड करण्यात आला. दिल्लीकडून तशाच प्रकारची चूक पुन्हा झाल्यास रिषभ पंतला एका मॅचमधून बाहेर बसावं लागेल. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसनला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमध्ये स्लो ओव्हर रेट प्रकरणी संजूवर कारवाई करण्यात आली होती.
राजस्थान टॉपवर कोलकाता दुसऱ्या स्थानी
आयपीएलमध्ये आतापर्यंत 31 मॅच पार पडल्या आहेत. यामध्ये 7 पैकी 6 मॅचमध्ये विजय मिळवत 12 गुणासंह राजस्थान पहिल्या स्थानावर आहे. तर, सहा पैकी चार मॅचमध्ये विजय मिळवत कोलकाता नाईट रायडर्स 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील मॅचमध्ये दोन शतकं झाली. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनील नरेननं 56 बॉलमध्ये 109 धावांची खेळी केली. याच्या जोरावर कोलकातानं 6 बाद 223 धावा केल्या. तर, राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलरनं 60 बॉलमध्ये 109 धावांची खेळी केली आणि विजयावर शिक्कामोर्तब केलं. जोस बटलरचं यंदाच्या आयपीएलमधील दुसरं शतक ठरलं.
संबंधित बातम्या :