Jos Butler : शतक होऊनही सेलिब्रेशन केलं नाही, धोनी आणि कोहलीचा फॉर्म्युला वापरुन केकेआरला हरवलं, बटलर काय म्हणाला?
Jos Butler : कोलकाता नाईट रायडर्सच्या हातातून विजय हिसकावून घेणाऱ्या जोस बटलरनं मॅच संपल्यानंतर मोठं वक्तव्य केलं. धोनी आणि विराट कोहली ज्या प्रमाणं खेळतो तसं खेळण्याचं प्रयत्न केल्याचं त्यानं म्हटलं.
कोलकाता : राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) काल झालेल्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) दोन विकेटनं पराभूत केलं. राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकातानं पहिल्यांदा बॅटिंग करताना 6 विकेटवर 223 धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सनं डावाच्या अखेरच्या बॉलवर विजय मिळवला. राजस्थानला जोस बटलरनं एकहाती विजय मिळवून दिला. जोस बटलरनं (Jos Butler) 60 बॉलमध्ये 107 धावा केल्या. जोस बटलरनं या खेळीमध्ये नऊ चौकार आणि सहा षटकार मारले. बटलरच्या या खेळीबद्दल त्याचं प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना बटलरनं विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीचा उल्लेख केला.
जोस बटलर काय म्हणाला?
जोस बटलरनं धोनी आणि विराट कोहलीसंदर्भात बोलताना म्हटलं की संपूर्ण आयपीएलमध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील. धोनी आणि कोहली यांच्यासारखे खेळाडू ज्या प्रकारे शेवटपर्यंत टिकून राहतात, आत्मविश्वासानं खेळतात. तुम्ही आयपीएलमध्ये हे अनेकदा पाहिलं असेल, असं जोस बटलरनं म्हटलं.कुमार संगकारानं मला खूप गोष्टी सांगितल्या आहेत, असंही बटलर म्हणाला.
जोस बटलरचं दुसरं शतक
राजस्थान रॉयल्सनं जोस बटलरला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी दिलेली नव्हती. बटलरला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात स्थान देण्यात आलं होतं. यशस्वी जयस्वालसह बटलरनं डावाची सुरुवात केली होती. जोस बटलरनं मैदानावर तळ ठोकून मॅचमध्ये विजय मिळवून दिला. जोस बटलरनं अखेरच्या ओव्हरमध्ये 9 धावा करुन विजय मिळवला. बटलरनं आयपीएलमध्ये 7 शतकं केली आहेत.
जोस बटलरनं रियान पराग आणि त्यानंतर रोव्हमन पॉवेल याच्यासोबत भागिदारी केली. नवव्या विकेटसाठी आवेश खान याच्यासोबत भागिदारी करुन जोस बटलरनं विजय मिळवला.
राजस्थान गुणतालिकेत पहिल्या स्थानावर
राजस्थान रॉयल्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये 7 पैकी 6 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. राजस्थान रॉयल्स सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. राजस्थाननंतर दुसऱ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्स आहे. कोलकाता नाईट रायडर्सला त्यांच्या होम ग्राऊंडवर पहिला पराभव स्वीकारावा लागला. कोलकातानं यंदाच्या आयपीएलमध्ये सहा पैकी चार मॅचमध्ये विजय मिळवलेला असून 8 गुणांसह ते दुसऱ्या स्थानावर आहेत.
दरम्यान, आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने येणार आहेत. गुजरात टायटन्सनं तीन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सनं आतापर्यंत दोन वेळा विजय मिळवला आहे.
संबंधित बातम्या :
'आवेश द फिनिशर', राजस्थानच्या विजयात अनोखी कामगिरी, लखनौकडून आवेश खानसाठी भन्नाट ट्विट