(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024 : पॅट कमिन्सनं भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं, भारतातील सर्वाधिक आवडणारी आठवण म्हणत पोस्ट शेअर केली अन्...
IPL 2024 : आयपीएलमध्ये पॅट कमिन्स सध्या सनरायजर्स हैदराबादचे नेतृत्त्व करत आहे. पॅट कमिन्सनं इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.
हैदराबाद : सनरायजर्स हैदराबादचं (Sunrisers Hyderabad) नेतृत्त्व करणाऱ्या पॅट कमिन्सनं (Pat Cummins) इन्स्टाग्रामवर काही स्टोरी शेअर केल्या आहेत. त्यामध्ये 2023 मध्ये वर्ल्ड कप जिंकला ती भारतातील सर्वाधिक आवडणारी आठवण असल्याचं म्हणत भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं. पॅट कमिन्सनं चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं देताना हे फोटो शेअर केले आहेत. भारतीय क्रिकेट चाहते 2023 च्या वर्ल्ड कप सामन्यातील पराभव विसरु शकलेले नाहीत. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये आस्ट्रेलियानं भारताला पराभूत केलं होतं. भारतानं पहिल्यांदा बॅटिंग करातना 240 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियानं ते आव्हान चार विकेट गमावून पूर्ण केलं होतं.
सनरायजर्स हैदराबादचा आवडता खेळाडू कोण?
पॅट कमिन्सला याशिवाय आणखी एक प्रश्न विचारण्यात आला होता. सनरायजर्स हैदराबादच्या ड्रेसिंग रुममधील त्याचा आवडता खेळाडू कोण आहे असं विचारलं असता त्यानं ट्रेविस हेडचा फोटो इन्स्टाग्राम स्टेटसला ठेवला. ट्रेविस हेडनं वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत चांगली कामगिरी केली होती. हेडच्या फलंदाजीमुळं ऑस्ट्रेलियानं मॅच जिंकली होती. कमिन्सनं हैदराबादमधील आवडतं ठिकाण गोवळकोंडा असल्याचं म्हटलं.
पॅट कमिन्सनं भारतातील आवडता पदार्थ हा पावभाजी असल्याचं म्हटलं आह. याशिवाय काही फॅन्सनी पॅट कमिन्सला वेगवेगळे प्रश्न विचारले होते. त्यामध्ये उंची वाढवण्यासाठी काय करावं लागेल. यावर पॅट कमिन्सनं दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यान्सेनसोबत चर्चा करण्याचा सल्ला दिला. यानंतर क्रिकेटशिवाय काय खेळायला आवडेल, असं विचारलं असता त्यानं गोल्फ खेळायला आवडेल, असं सांगितलं.
सनरायजर्स हैदराबाद पाचव्या स्थानी
पॅट कमिन्सकडे यंदा सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्त्व देण्यात आलं आहे. यावेळी सनरायजर्स हैदराबादनं पाच पैकी तीन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. सनरायजर्स हैदराबाद गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.
भारताचा वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्यांदा पराभव
भारत आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनलमध्ये दोनवेळा आमने सामने आले आहेत. 2003 आणि 2023 च्या वर्ल्डकपमधील अंतिम फेरीच्या लढतीत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताला ऑस्ट्रेलियानं 2003 च्या अंतिम फेरीच्या लढतीत पराभूत केलं होतं. टीम इंडिया 2023 ला 2003 च्या पराभवाचा बदला घेईल, अशी भारतीय चाहत्यांची इच्छा होती. मात्र,2023 च्या वर्ल्ड कप फायनलमध्येही भारताला पराभव स्वीकारावा लागला आणि करोडो भारतीय चाहत्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं.
संबंधित बातम्या :
LSG vs KKR : निकोलस पूरननं एकहाती डाव सावरला, केकेआरपुढं लखनौनं किती धावांचं आव्हान ठेवलं?