(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CSK vs RCB : सांघिक कामगिरीच्या जोरावर चेन्नईचं अभियान विजयानं सुरु, आरसीबीच्या नशिबी चेपॉकवर पुन्हा पराभव
CSK vs RCB : आयपीएलच्या पहिल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात रोमहर्षक सामना पार पडला. आरसीबीनं चेन्नईला 174 धावांचं आव्हान दिलं होतं.
चेन्नई : आयपीएलच्या 2024 (IPL 2024) च्या पर्वाची सुरुवात ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि फाफ डु प्लेसिस (Faf du Plesis) याच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challenges Bengaluru) यांच्यातील लढतीनं झाली. या लढतीत पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या आरसीबीनं 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 173 धावा केल्या होत्या. आरसीबीनं दिलेलं 174 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी चेन्नईची टीम मैदानात उतरली होती.चेन्नईला राचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरेल मिशेल यांनी चांगली सुरुवात करुन दिली. मात्र, नियमित अंतरानं विकेट पडत गेल्यानं मॅचमध्ये चुरस निर्माण झाली होती. चेन्नईनं 19 व्या ओव्हरमध्येच विजय मिळवत आरसीबीला पराभूत केलं. चेन्नईनं यंदाच्या आयपीएलची सुरुवात सांघिक कामगिरीच्या जोरावर विजयानं केली आहे. राचीन रवींद्रनं चेन्नईच्या विजयाचा पाया रचला तर रवींद्र जडेजा आणि शिवम दुबेनं विजयाचा कळस चढवला.
चेन्नईची आक्रमक सुरुवात
आरसीबीनं दिलेल्या 174 धावांचा आव्हान पाठलाग करणाऱ्या चेन्नईच्या टीमनं आक्रमक सुरुवात केली. मात्र, कर्णधार ऋतुराज गायकवाड आज मोठी धावसंख्या करु शकला नाही. तो 15 धावा करुन बाद झाला. राचीन रवींद्रनं एका बाजुनं फटकेबाजी सुरुच ठेवली होती. त्यानं 15 बॉलमध्ये 37 धावा केल्या. त्यानं तीन षटकार आणि तीन चौकार लगावले होते. ऋतुराज गायकवाडला यश दयाळनं बाद केलं. तर राचीन रवींद्रला कर्ण शर्मानं बाद केलं. अजिंक्य रहाणे आणि डॅरेल मिशेल चेन्नईचा डाव सावरणार असं वाटत असतानाच 27 धावा करुन अजिंक्य रहाणे बाद झाला. डॅरेल मिशेल देखील 22 धावा करुन बाद झाला. यानंतर रवींद्र जडेजा आणि शिवम दुबेनं चेन्नईचा डाव सावरला.
आरसीबीकडून चेन्नईला 174 धावांचं आव्हान
आरसीबीचा कॅप्टन टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. फाफ डुप्लेसिसनं आक्रमक बॅटिंग ८ चौकार मारत 35 धावा केल्या होत्या. चेन्नईच्या मुस्तफिजूर रहमाननं त्याला बाद केल्यानंतर आरसीबी बॅकफूटवर गेली. रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल शुन्यावर बाद झाले. विराट कोहली आणि कॅमरुन ग्रीन आरसीबीच्या डावाला सावरतील असं वाटत असतानाच मुस्तफिजूर रहमाननं त्यांना बाद केलं.
विराट कोहली 21 धावांवर तर कॅमरुन ग्रीनं 18 धावांवर बाद झाला.
यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या अनुज रावत आणि दिनेश कार्तिकनं बंगळुरुचा डाव सावरला. अनुज रावत आणि दिनेश कार्तिकच्या 95 धावांच्या भागिदारीमुळं आरसीबीनं 20 ओव्हर्समध्ये 173 धावांपर्यंत मजल मारली. अनुज रावतनं 25 बॉलमध्ये 48 धावा केल्या तर दिनेश कार्तिकनं 38 धावा केल्या.