IPL 2024 LSG vs CSK : लखनौकडून होम ग्राऊंडवर पराभव, चेन्नई सुपर किंग्जचं प्लेऑफचं गणित बिघडणार? कमबॅकसाठी ऋतुराजला काय करावं लागणार?
IPL 2024 : लखनौ सुपर जाएंटसनं सलग दुसऱ्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केलं आहे. यामुळं चेन्नईचं प्लेऑफचं गणित कठीण झालंय.
चेन्नई : आयपीएलमधील (IPL 2024) 39 व्या मॅचमध्ये लखनौ सुपर जाएंट्सने (Lucknow Suprer Giants) मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सहा विकेटने पराभव केला आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर काल धावांचा पाऊस पडला. चेन्नईचा हा होम ग्राऊंड वरील यंदाच्या आयपीएलमधील पहिला पराभव ठरला. लखनौने पहिल्यांदा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला होता. चेन्नईकडून पहिल्यांदा बॅटिंग करताना कॅप्टन ऋतुराज गायकवाडने शतकी खेळी केली. शिवम दुबे याने देखील अर्धशतक झळकावले. चेन्नईने 20 ओव्हर्स मध्ये 4 बाद 210 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने 60 बॉलमध्ये 108 धावा केल्या तर शिवम दुबे याने 27 बॉल मध्ये 66 धावांची खेळी केली. लखनौनं हे आव्हान सहा विकेट राखून पार केलं. यामध्ये स्टोइनिसने केलेल्या शतकी खेळीचा महत्त्वाचा वाटा होता. लखनौ सुपर जाएंटसनं चेन्नई सुपर किंग्जला सलग दुसऱ्या मॅचमध्ये पराभूत केलं.
स्टोइनिसनं लखनौला विजय मिळवून दिला
लखनौच्या मार्कस स्टोइनिस याने शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. त्याने 63 बॉल मध्ये 124 धावा केल्या. यामध्ये त्याने 13 फोर आणि सहा सिक्स मारले. स्टोइनिसला निकोलस पूरन याने 15 बॉलमध्ये 34 धावा करुन साथ दिली. या दोघांच्या खेळीमुळे चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेची खेळी वाया गेली.
यंदाच्या आयपीएलमध्ये झालेल्या आणखी एका पराभवामुळे चेन्नईची गुणतालिकेत घसरण झाली आहे. चेन्नईने आठ पैकी चार मॅचमध्ये विजय मिळवला आहे तर चार मॅचमध्ये त्यांचा पराभव झालाय. त्यामुळे आठ गुणांसह ते पाचव्या स्थानावर आहेत.
चेन्नईचं प्ले ऑफचं गणित नेमकं कसं?
गेल्या दोन आयपीएलमध्ये प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवणाऱ्या चौथ्या संघाने 16 गुण मिळवले होते. या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी चेन्नईला राहिलेल्या सहापैकी किमान चार मॅच चांगल्या नेट रन रेटने जिंकाव्या लागतील.
चेन्नईची पुढील मॅच येत्या रविवारी सन रायजर्स हैदराबाद विरुद्ध 28 एप्रिलला चेन्नईत होणार आहे. सनरायजर्स हैदराबादने यापूर्वी झालेल्या मॅचमध्ये चेन्नईचा सहा विकेटने पराभव केला होता. त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी चेन्नईकडे आहे. यानंतर 1 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमने सामने येतील. हेच दोन्ही संघ पुन्हा 5 मे रोजी धर्मशाला येथील मैदानावर आमने सामने येतील. यानंतर चेन्नईच्या लढती गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्याविरुद्ध होतील.
संबंधित बातम्या :
CSK vs LSG : स्टोइनिसचं शतक ऋतुराजवर भारी, लखनौचा 6 विकेट्सने विजय