हातातील मॅच घालवली, मुंबईची पुन्हा एकदा पहिली मॅच देवाला, गुजरातची झोकात सुरुवात!
IPL 2024 MI vs GT Match Highlights: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सनं अटीतटीच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा (Gujarat Titans vs Mumbai) सहा धावांनी पराभव केला
IPL 2024 MI vs GT Match Highlights: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सनं अटीतटीच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा (Gujarat Titans vs Mumbai) सहा धावांनी पराभव केला आहे. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरातने बाजी मारली. गुजरातच्या माऱ्यापुढे मुंबईच्या (MI First Match) फलंदाजांनी हाराकिरी केली. गुजरातने (GT) दिलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 162 धावांपर्यंत मजल मारली. गुजरातने अखेरच्या तीन षटकांमध्ये सामना फिरवला. या पराभवासह मुंबईने 2013 पासूनची परंपरा कायम राखली. मागील 11 वर्षांमध्ये मुंबईला आयपीएलच्या हंगामातील आपला पहिला सामना जिंकताच आला नाही.
गुजरात टायटन्सने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 168 धावा केल्या होत्या. गुजरातच्या गोलंदाजांनी 169 धावांचा यशस्वी बचाव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातने मुंबईचा 6 धावांनी पराभव केला. शुभमन गिल यानं आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून विजयी सुरुवात केली. त्याशिवाय गुजरातच्या संघानं यंदाच्या हंगामातील सुरुवातही विजयासह केली. गुजरात टायटन्सकडून गोलंदाजी करताना अजमतुल्ला ओमरझाई आणि मोहित शर्माने 2 विकेट्स घेतल्या आहेत, तर आर साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन, यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.
रोहित शर्मा आणि डेवॉल्ड ब्रेबिस लढले -
मुंबईचा माजी कर्णधार आणि डेवॉल्ड ब्रेविस यांनी शानदार खेळी केली. दोघांनी मुंबईला सामन्यामध्ये जिवंत ठेवलं होतं. रोहित शर्माने 29 चेंडूमध्ये 43 धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता. तर डेवाल्ड ब्रेविस यानं 38 चेंडूमध्ये 46 धावांचं योगदान दिलं. त्यानं आपल्या खेळीमध्ये तीन षटकार आणि दोन चौकार लगावले.
चांगली सुरुवात मिळाली, पण...
मुंबईकडून पदार्पण करणाऱ्या नमन धीर याला चांगली सुरुवात मिळाली, पण मोठी धावसंख्या करण्यात तो अपयशी ठरला. त्यानं 10 चेंडूमध्ये तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 20 धावांची खेळी केली. त्याशइवाय तिलक वर्मा यालाही मोठी खेळी करता आली नाही. तिलक वर्मा यानं 19 चेंडूमध्ये एक षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 25 धावांचं योगदान दिलं. या दोघांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 20 धावसंख्या ओलांडता आली नाही.
मुंबईच्या फलंदाजांची हराकिरी -
इशान किशन, टीम डेविड, हार्दिक पांड्या, गोर्लाड कोइत्जे यांनी हराकिरी करत सामना गमावला. ईशान किशन याला तर खातेही उघडता आले नाही. टीम डेविड यानं 10 चेंडूमध्ये फक्त 11 धावा केल्या. हार्दिक पांड्याने अखेरीस प्रयत्न केले, पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. हार्दिक पांड्याने चार चेंडूमध्ये एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 11 धावा केल्या. कोइत्जे याला तीन चेंडूमध्ये फक्त एक धाव काढता आली. पियूष चावला शून्यावर बाद झाला.
मुंबईने सामना कुठं गमावला -
डेवाल्ड ब्रेविस बाद झाला तेव्हा मुंबईची अवस्था 4 बाद 129 अशी भक्कम होती. पण त्यानंतर आलेल्या फलंदाजांनी हराकिरी केली. एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. टीम डेविड, तिलक वर्मा, कोइत्जे, हार्दिक पांड्या, पियूष चावला यांनी विकेट फेकल्या. गुजरातने अखेरच्या तीन षटकांमध्ये सामना फिरवला. मुंबईला तीन षटकात विजयासाठी 39 धावांची गरज होती. मोहित शर्माने भेदक मारा केला. त्याने टीम डेविड याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर स्पेन्सर जॉनसन यानं तिलक वर्मा आणि गेराल्ड कोइत्जे यांना एकापाठोपाठ एक तंबूत पाठवलं. अखेरच्या षटकात उमेश यादव यानं 19 धावांचा यशस्वी बचाव केला.