IPL 2023: विराट कोहलीचा बंगळुरू संघ विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार का? 'या' खेळाडूंवर असेल मदार
फाफ डू प्लेसिस याच्या नेतृत्वाखाली खेळणारा आणि विराट कोहलीचा समावेश असणारा संघ हा कागदोपत्री बलाढ्य आहे, पण आतापर्यंत त्यांने एकही स्पर्धा जिंकली नाही.
IPL 2023: यंदाच्या आयपीएल स्पर्धेत विजयी चषक उंचावून विराट कोहलीचा बंगळुरूचा संघ (RCB) विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्नात असेल. वास्तविक पाहता विराट कोहलीचा बंगळुरू संघ कागदावर जरी बलाढ्य वाटत असला तरीही आतापर्यंत त्यांना एकही स्पर्धा जिंकता आली नाही. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा जिंकून विराट कोहली चाहत्यांना सुखद धक्का देणार का याकडे सर्वाचं लक्ष असेल.
फाफ डू प्लेसिस याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बंगळुरूच्या संघाची मदार या पाच खेळाडूंवर असेल,
विराट कोहली (Virat Kohli)
कोहलीने आरसीबीसाठी नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. विराट कोहलीचा सध्याचा फॉर्म पाहता यंदा त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडेल अशी आशा आहे. संघाला पहिले विजेतेपद मिळवून देण्यात विराट कोहली मोठी भूमिका बजावू शकतो.
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)
ग्लेन मॅक्सवेलने गेल्या मोसमात चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे कोहली आणि डू प्लेसिस यांच्यावर असलेला दबाव कमी असेल. मॅक्सवेलने यापूर्वी अनेक मॅच विनिंग इनिंग्स खेळल्या होत्या. अशा परिस्थितीत आरसीबी कॅम्पला यावेळी त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
रजत पाटीदार
रजत पाटीदारने गेल्या मोसमात आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली होती. आरसीबीसाठी डू प्लेसिस आणि विराट कोहली यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा खेळाडू होता. अशा परिस्थितीत या मोसमातही चाहत्यांच्या त्याच्याकडून अपेक्षा असतील.
जोश हेझलवूड
32 वर्षीय हेजलवूडला आरसीबीने गेल्या वर्षी 7.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. बेंगळुरूला हेजलवूडकडून मोठ्या आशा आहेत.
मोहम्मद सिराज (Mohhamad Siraj)
एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर 1 गोलंदाज मोहम्मद सिराजसाठी शेवटचा आयपीएल हंगाम काही खास नव्हता. पण या एका वर्षात बरेच काही बदलले आहे. सध्या सिराज कोणत्याही फलंदाजीची फळी उद्ध्वस्त करू शकतो. त्याच्यामुळे आरसीबीची गोलंदाजी भक्कम असल्याचं चित्र आहे.
रजत पाटीदार हंगामातील पूर्वार्धातून बाहेर
संघाचा स्टार फलंदाज रजत पाटीदार टाचेच्या दुखापतीमुळे या आयपीएल हंगामाच्या पूर्वार्धातून बाहेर असू शकतो. पाटीदार हा आयपीएल 2022 मध्ये आरसीबीसाठी महत्त्वाचा फलंदाज आहे. त्याने एलिमिनेटर सामन्यात आपल्या शतकासह संघाला विजय मिळवून दिला होता.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संभाव्य प्लेइंग इलेव्हन : फाफ डुप्लेसी (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर/मायकेल ब्रेसवेल, हर्षल पटेल, वनिंदू हसरंगा, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज.
ही बातमी वाचा: