LSG vs MI, 1 Innings Highlights: स्टॉयनिसचे वादळ, लखनौची 177 धावांपर्यंत मजल
IPL 2023, LSG vs MI : मुंबई इंडियन्सला विजयासाठी 178 धावांची गरज आहे.
IPL 2023, LSG vs MI: स्टॉयनिसच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर लखनौने तीन विकेटच्या मोबदल्यात 177 धावांपर्यंत मजल मारली. स्टॉयनिसने नाबाद 89 धावांची खेळी केली. तर कृणाल पांड्या याने 49 धावांचे योगदान दिले. वेगवान गोलंदाजीवर स्टॉयनिस याने धावांचा पाऊस पाडला. फिरकीने फेकलेल्या सहा षटकात लखनौला फक्त 46 धावा काढता आल्या. लखनौच्या फलंदाजांनी वेगवान गोलंदाजीवर धावांचा पाऊस पाडला. खासकरुन स्टॉयनिसने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. मुंबई इंडियन्सला विजयासाठी 178 धावांची गरज आहे.
स्टॉयनिसचे वादळ -
मार्कस स्टॉयनिस याने वादळी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. स्टॉयनिस याने संयमी सुरुवात केली. सेट झाल्यानंतर मुंबईच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. अखेरीस स्टॉयनिस याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. अखेरच्या तीन षटकात 20 च्या सरासरीने धावा चोपल्या. स्टॉयनिसने याने कर्णधार कृणाल पांड्या याच्यासोबत अर्धशतकी भागिदारी केली. त्यानंतर पूरनसोबत धावांचा पाऊस पाडला. मार्कस स्टॉयनिस याने 47 चेंडूत 89 धावांची खेळी केली. या खेळीत स्टॉयनिस याने आठ षटकार आणि चार चौकार लगावले. त्याशिवाय पूरन आणि स्टॉयनिस यांनी 26 चेंडूत 60 धावांची भागिदारी केली.
कृणाल पांड्याची दमदार खेळी -
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. लखनौच्या तीन विकेट झटपट गेल्या. त्यानंतर कृणाल पांड्याने स्टॉयनिसच्या साथीने लखनौच्या डावाला आकार दिला. कृणाल पांड्या याने संयमी फलंदाजी करत लखनौचा डाव सावरला. कृणाल पांड्या याने 42 चेंडूत संयमी 49 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक चौकार आणि एक षटकार लगावला. कृणाल पांड्या याने अँकरची भूमिका बजावत लखनौच्या डावाला आकार दिला. कृणाल पांड्या याने स्टॉयनिस याच्यासोबत 59 चेंडूत 82 धावांची भागिदारी केली. यामध्ये कृणाल पांड्याचे योगदान 36 धावांचे होते. स्टॉयनिसआधी पांड्याने डिकॉकसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कृणाल पांड्याने डिकॉक याच्यासोबत 23 धावांची भागिदारी केली. कृणाल पांड्याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. 49 धावा झाल्या पण खेळपट्टीवर धावताना पांड्याला त्रास जाणवत होता. त्यामुळे पांड्याने Retired Hurt होण्याचा निर्णय घेतला.
कृणाल पांड्या दुखापतग्रस्त -
केएल राहुल दुखापतीमुळे आधीच आयपीएलमधून बाहेर गेलाय. केएल राहुल याच्याजागी कृणाल पांड्या लखनौच्या संघाची धुरा सांभाळत आहे. पण इकाना स्टेडिअमवर कृणाल पांड्या यालाही दुखापत झाल्याचे समोर आलेय. कृणाल पांड्या याला फलंदाजी करताना त्रास होत होता.. त्याला धाव घेता येत नव्हती. त्यामुळे 49 धावांवर असताना कृणाल पांड्या Retired Hurt झाला. कृणाल पांड्याची दुखापत लखनौच्या संघाची चिंता वाढवणारी आहे. पांड्याची दुखापत किती गंभीर आहे, हे अद्याप समजू शकले नाहीत. तो गोलंदाजीसाठी मैदानावर येणार का? इतर कोणता खेळाडू संघाची धुरा सांभाळणार.. हे लवकरच स्पष्ट होईल. कृणाल पांड्या याने 42 चेंडूत संयमी 49 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक चौकार आणि एक षटकार लगावला.
इतर फलंदाजांची कामगिरी कशी ?
लखनौची सुरुवात निराशाजनक झाली. दीपक हुड्डा पुन्हा एकदा मोठी खेळण्यात अपयशी ठरला. हुड्डा फक्त पाच धावा काढून तंबूत परतला. प्रेरक मंकड याला खातेही उघडता आले नाही. जेसन बेहरनड्रॉफ याने एकाच षटकात दोन विकेट घेत लखनौला अडचणीत टाकले. क्विंटन डिकॉक यालाही चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करता आली नाही. डिकॉक 16 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत दोन षटकार लगावले. निकोलस पूरन याने आठ धावांचे योगदान दिले.