लखनौ-चेन्नई यांच्यातील सामन्यात पावसाचा 'विजय', दोन्ही संघाला एक एक गुण
IPL 2023, LSG vs CSK: चेन्नई आणि लखनौ यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. दोन्ही संघाला एक एक गुण देण्यात आले.
LSG vs CSK, Match Highlights : लखनौ आणि चेन्नई यांच्यातील सामना पावसामुळे धूतला गेला आहे. सामना सुरु होण्याआधी आणि सामन्यामध्येही पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे तासभर सामना उशीरा सुरु झाला होता. लखनौची फलंदाजी सुरु असताना अखेरच्या षटकात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना थांबववा लागला. पण पावसाने थांबायचे नाव घेतले नाही. थोड्यावेळानंतर पाऊस थांबण्याची चिन्हे दिसली.. त्यामुळे चेन्नईला डकवर्थ लुईस नियमानुसार आव्हान देण्यात आले. पण पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. पंचांनी पाहणी करत सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
चेन्नई आणि लखनौ यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. दोन्ही संघाला एक एक गुण देण्यात आले. एक एक गुण मिळाल्यामुळे दोन्ही संघांनी गुणतालिकेत झेप घेतली आहे. याचा फटका राजस्थानला बसला. राजस्थान चौथ्या क्रमांकावर घसरले आहे. लखनौने 10 सामन्यात पाच विजयासह 11 गुण घेतले आहेत. तर चेन्नईचेही दहा सामन्यात 11 गुण झाले आहेत. चेन्नईने पाच विजय मिळवले आहेत.
दरम्यान, चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आयुष बडोनीच्या अर्धशतकाच्या बळावर लखनौने 19.2 षटकात सात बाद 125 धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. आयुष बडोनी याने 33 चेंडूत नाबाद 59 धावांची खेळी केली.
बडोनीची अर्धशतकी खेळी -
चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी धोनीचा निर्णय सार्थ ठरवत लखनौच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक तंबूत धाडले. लखनौला पहिला धक्का 18 धावांवर बसला. काइल मेयर्स याला 14 धावांवर मोईन अली याने तंबूत पाठवले. काइल मेयर्स याने 17 चेंडूत 14 धावांची खेळी केली. यामध्ये दोन चौकारांचा समावेश आहे. मेयर्सनंतर मनन वोहराही लगेच तंबूत परतला. वोहरा याने 11 चेंडूत एका चौकारासह 10 धावांचे योगदान दिले. सलामी जोडी तंबूत परतल्यानंतर लागोपाठ विकेट पडल्या. कृणाल पांड्याला खातेही उघडता आले नाही. तर करण शर्मा 16 चेंडूत 9 धावा काढून बाद झाला. रविंद्र जाडेजा याने मार्कस स्टॉयनिसला बाद करत लखनौच्या अडचणी आणखी वाढवल्या. मार्कस स्टॉयनिस सहा धावांवर माघारी परतला. आयुष बडोनी याने अखेरपर्यंत किल्ला लढवला. आयुष बडोनी याने 33 चेंडूत नाबाद 59 धावांची खेळी केली. बडोनी याने आपल्या या खेळीत 4 षटकार आणि दोन चौकार लगवाले. पाऊस येण्यापूर्वी आयुष बडोनी याने दमदार फलंदाजी करत लखनौचा डाव सावरला.
स्टॉयनिस बाद झाल्यानंतर लखनौचा डाव लवकर आटोपणार असेच म्हटले जात होते. पण युवा आयुष बदोनी आणि निकोलस पूरन यांनी लखनौच्या डावाला आकार दिला. निकोलस पूरन आणि बदोनी यांनी सहाव्या विकेटसाठी 48 चेंडूत 59 धावा जोडल्या. लखनौची ही सर्वात मोठी भागिदारी होय. पथीराना याने निकोलस पूरन यलाला बाद करत ही जोडी फोडली. पूरन याने 31 चेंडूत 20 धावांचे योगदान दिले. विस्फोटक निकोलस पूरन याला एकही चौकार आणि एकही षटकार मारता आला नाही. पूरन बाद झाल्यानंतर सामन्याची सर्व सुत्रे आयुष बडोनी याने आपल्या हातात घेतली. बडोनी याने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. बडोनीच्या अर्धशतकाच्या बळावर लखनौचा संघ 120 ची धावसंख्या पार करु शकला.
चेन्नईची भेदक फिरकी -
चेन्नईच्या फिरकी गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत लखनौच्या फलंदाजांना तंबूत धाडले. रविंद्र जाडेजा, मोईन अली आणि महिश तिक्ष्णा यांनी पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. महिश तिक्ष्णा आणि मोईन अली यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर रविंद्र जाडेजा याने एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. मोईन अली याने चार षटकात 13 धावा खर्च केल्या. महिश तिक्ष्णा याने चार षटकात 37 धावा दिल्या. रविंद्र जाडेजा याने तीन षटकात 11 धावा दिल्या. दीपक चाहर याने चार षटकात 41 धावा दिल्या.