'वेगवान' मलिक! नेट गोलंदाज ते हैदराबादचा हुकमी 'एक्का'
IPL 2022, Umran Malik : उमरान मलिकची आयपीएलमध्ये एन्ट्री कशी झाली? याचीही एक कहाणी आहे. गेल्या मोसमात उमरान मलिक हा हैदराबाद संघाचा नेट बॉलर होता.
IPL 2022, Umran Malik : ताशी दीडशे किलोमीटर्सचा वेग, परफेक्ट अॅक्शन आणि फलंदाजांची दांडी गुल करणारा खतरनाक यॉर्कर टाकत सनरायझर्स हैदराबादचा उमरान मलिक सध्या आयपीएलचं मैदान गाजवतोय. आयपीएलच्या १५ व्या मोसमात अवघ्या 22वर्षांच्या या युवा गोलंदाजानं अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलंय.
सुरुवातीला उमरान मलिक अनेकांच्या नजरेत भरला तो त्याच्या भन्नाट वेगामुळे. यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाला खास पुरस्कार दिला जातो. सनरायझर्स हैदराबादच्या गेल्या आठ सामन्यात सलग आठ वेळा दीडशे किलोमीटर्सपेक्षा जास्त वेगानं गोलंदाजी करून उमरान मलिकनं हा पुरस्कार पटकावलाय. याच वेगाच्या जोरावर उमरान मलिकनं आतापर्यंत आठ सामन्यात 12 च्या सरासरीनं तब्बल 15 विकेट्स घेतल्या आहेत. गुजरातविरुद्ध 25 धावात 5 विकेट्स ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
पण याच उमरान मलिकची आयपीएलमध्ये एन्ट्री कशी झाली? याचीही एक कहाणी आहे. गेल्या मोसमात मूळचा जम्मू काश्मीरचा असलेला उमरान मलिक हा हैदराबाद संघाचा नेट बॉलर होता. त्याच वेळी कोरोनामुळे डावखुरा गोलंदाज टी. नटराजन संघाबाहेर गेला. आणिबाणीच्या त्या परिस्थितीत नटराजनऐवजी उमरान मलिकला हैदराबाद संघात जागा मिळाली. त्या मोसमात उमरान मलिकच्या वाट्याला केवळ तीन सामने आले. पण हैदराबादच्या संघव्यवस्थापनानं त्याच्यातली गुणवत्ता ओळखली होती. आणि त्यांनी फेब्रुवारीच्या मेगा ऑक्शनआधीच केन विल्यमसन आणि आणि अब्दुल समद या दोघांसह चार कोटींची घसघशीत रक्कम देऊन उमरान मलिकलाही आपल्या संघात रिटेन केलं.
हैदराबादचं हेच नाणं यंदा आयपीएलच्या मैदानात खणखणीत वाजतंय. आयपीएलमधल्या याच कामगिरीनंतर बीसीसीआयच्या निवड समितीच्या नजरा उमरान मलिककडे नक्कीच वळल्या असतील. आणि त्याचं कारण आहे ऑस्ट्रेलियात होणारा आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात स्थान मिळवण्याची उमरान मलिकला चांगली संधी आहे. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमीच्या साथीला उमरान मलिक चांगला पर्याय ठरु शकतो. त्यात ऑस्ट्रेलियातल्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्या उमरान मलिकसाठी अनुकूल ठराव्यात.
आयपीएलनं आजवर अनेक खेळाडू भारतीय संघाला दिले आहेत. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, कृणाल पंड्या, शार्दूल ठाकूर याशिवाय अलिकडेच संघात आलेले सूर्यकुमार यादव, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर, टी. नटराजन हे सगळे आयपीएलनं दिलेले हिरे आहेत. याच यादीत आता उमरान मलिकचा समावेश होतो का हे पहावं लागेल.