IPL 2022 : फ्लॉप टू हिट... गतवर्षी खराब कामगिरीमुळे ठरले टिकेचे धनी, पण यंदाच्या हंगामात सोडली छाप
IPL 2022 Marathi News : 14 व्या हंगामात फ्लॉप गेले होते. त्यांनी यंदा धावांचा पाऊस पाडलाय.
IPL 2022 Marathi News : आयपीएलच्या 15 व्या हंगामात अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी करत लक्ष वेधलं आहे. युवा खेळाडूंपासून अनुभवी खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलेय. पण असे काही खेळाडू आहेत, जे आयपीएलच्या 14 व्या हंगामात फ्लॉप गेले होते. त्यांनी यंदा धावांचा पाऊस पाडलाय. या खेळाडूंना आपापल्या संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिलेय. पाहूयात.. त्या खेळाडूबद्दल... मागील हंगामात फ्लॉप राहिलेल्या पण यंदाच्या हंगामात धुमाकूळ घालणाऱ्या केळाडूबद्दल...
लियाम लिव्हिंगस्टोन
लियाम लिव्हिंगस्टोनने यंदा पंजाबसाठी तुफानी फटकेबाजी केली. लियामने आतापर्यंत दहा सामन्यात 293 धावांचा पाऊस पाडलाय. यादरम्यान त्याने तीन अर्धशतकं झळकावली आहेत. लियामने 186.62 च्या स्ट्राईकरेटने धावांचा पाऊस पाडलाय. मागील हंगामात लियाम लिव्हिंगस्टोन राजस्थानच्या संघाचा भाग होता. गेल्या हंगामात लियामला पाच सामन्यात फक्त 42 धावाच करता आल्या होत्या.
शिमरोन हेटमायर
राजस्थानसाठी शिमरोन हेटमायर दमदार कामगिरी करत आहे. दहा सामन्यात हेटमायरने 163 च्या स्ट्राईक रेटने 260 धावांचा पाऊस पाडलाय. हेटमायर मागील हंगामात दिल्लीच्या संघाचा भाग होता. यावेळी 13 डावात हेटमायरला 242 धावाच चोपता आल्या होत्या.
दिनेश कार्तिक
दिनेश कार्तिकने यंदाच्या हंगामात तुफानी फटकेबाजी केली आहे. कार्तिकने पुन्हा एकदा भारतीय संघातील दावेदारी दाखवली आहे. कार्तिकला यंदा आरसीबीने आपल्या संघात घेतलेय. कार्तिकने यंदा दहा सामन्यात 189.15 स्ट्राईकरेटने 244 धावांचा पाऊस पाडला. गतवर्षी कोलकाताकडून खेळताना कार्तिकने 15 डावांत 223 धावा केल्या होत्या.
कुलदीप यादव -
कुलदीप यादवने यंदाच्या हंगामत आपल्या गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या इराद्याने कुलदीप यादवने भेदक मारा केलाय. यंदाच्या हंगामात दिल्लीकडून खेळताना कुलदीप यादवने 10 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. चार सामन्यात कुलदीपने सामनावीर पुरस्कार पटकावलाय. गतवर्षी झालेल्या आयपीएलमध्ये कुलदीप यादव कोलकात्याकडून होता. खराब कामगिरीमुळे कुलदीपला बेंचवरच बसवले होते. दोन वर्ष कोलकात्याकडून कुलदीप यादवने निराशाजनक कामगिरी केली होती.