(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022 : मुकेश चौधरीचा भेदक मारा, चेन्नईला विजयासाठी 156 धावांचे आव्हान
MI vs CSK Match Live Update : तिलक वर्माच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर मुंबईने निर्धारित 20 षटकांत सात बाद 155 धावांपर्यंत मजल मारली.
MI vs CSK Match Live Update : तिलक वर्माच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर मुंबईने निर्धारित 20 षटकांत सात बाद 155 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईच्या फलंदाजांची तारांबळ उडाली होती. मुंबईने 50 धावांच्या आत आघाडीचे चार फलंदाज गमावले होते. पण तिलक वर्माने केलेल्या संयमी फलंदाजीच्या जोरावर मुंबईने सन्माजनक धावसंख्या उभारली. चेन्नईला विजयासाठी 156 धावांचे आव्हान देण्यात आले आहे.
नाणेफेकीचा कौल चेन्नईच्या बाजूने -
डी वाय पाटील स्टेडिअममध्ये सुरु असलेल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल चैन्नईच्या बाजूने लागला. चेन्नईचा कर्णधार रविंद्र जाडेजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
चेन्नईचा भेदक मारा -
कर्णधार रविंद्र जाडेजाने घेतलेला निर्णय चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक ठरवला. पहिल्यापासूनच चेन्नईच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांनर दबाव निर्माण केला. चेन्नईकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर मिचेल सँटरनेर, महिश तिक्षणा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. तर ब्राव्होने मुंबईच्या दोन फलंदाजांना बाद केले.
मुकेश चौधरीचा भेदक मारा -
वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने भेदक मारा करत मुंबईच्या फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. मुकेश चौधरीच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईची आघाडीची फळी ढेफाळली. मुकेश चौधरीने पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला बाद करत मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर ईशान किशन आणि डेवॉल्ड ब्रेविसला बाद करत मुंबईची आघाडी फळी उद्धवस्थ केली. मुकेश चौधरीने तीन षटकात 19 धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले. मुकेश चौधरीने तीन षटकात तब्बल 12 चेंडू निर्धाव फेकले. मुकेशच्या गोलंदाजीपुढे मुंबईची फलंदाजी कमकुवत वाटत होती.
मुंबईच्या फलंदाजांचं लोटांगण -
चेन्नईच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईच्या फंलदाजांनी लोटांगण घेतलं. पहिल्याच चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. त्याच्यापाठोपाठ ईशान किशनही तंबूत परतला. दोन धावांवर मुंबईचे दोन गडी बाद झाले होते. त्यानंतर डेवॉल्ड ब्रेविसही (4) बाद झाला. सूर्यकुमार यादवने थोडाफार प्रतिकार केला. पण 32 धावांवर सूर्यकुमार यादवचा सँटनरने अडथळा दूर केला. पदार्पण करणाऱ्या ह्तिक शॉकिन याने 25 धावांची खेळी केली. पोलार्डला 14 धावांवर तिक्षणाने तंबूत धाडले. डॅनिअल सॅम्सलाही (5) मोठी खेळी करण्यात अपयश आले. उनाडकदने 19 धावांची विस्फोटक खेळी करत संघाची धावसंख्या 150 पार पोहचवली.
तिलक वर्माची एकाकी झुंज -
मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्माने एका बाजूने संयमी फलंदाजी केली. एका बाजूला विकेट पडत असताना तिलक वर्माने आपला संयम सोडला नाही. तिलक वर्माने 43 चेंडूत संयमी 51 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीदरम्यान तिलक वर्माने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले.
दोन्ही संघात बदल
नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडिअममध्ये सुरु असलेल्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार रविंद्र जाडेजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. महत्वाच्या सामन्यात मुंबईच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. मुंबईने रायली मेरीडेथ, ह्रतिक शॉकिन आणि डॅनिअल सॅम यांना संघात संधी दिली आहे. रॅली मेरीडेथ हा वेगवान गोलंदाज आहे. तर ह्रतिक शॉकिन हा फिरकी गोलंदाज आहे. चेन्नईच्या संघातील डाव्या हाताचे फलंदाज असल्यामुळे मुंबईने शॉकिनला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाच्या सामन्यात चेन्नईने आपल्या संघात दोन मोठे बदल केले आहेत. चेन्नईने मोईन अली आणि ख्रिस जॉर्नला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्याजागी ड्वेन प्रिटोरियस आणि मिचेल सँटनेरला संधी देण्यात आली आहे.