IPL 2020 : अंबाती रायडू संघाबाहेर; चेन्नई सुपर किंग्सच्या अडचणीत आणखी वाढ
आयपीएल 2020 च्या सलामीच्या सामन्याचा हिरो अंबाती रायडू राजस्थान विरूद्धच्या सामन्यातही खेळू शकला नव्हता. याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा 16 धावांनी पराभव झाला होता.
IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सचा यंदाच्या आयपीएलमधील तिसरा सामना 25 सप्टेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्ससोबत होणार आहे. अशातच धोनीच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. आधीच सुरेश रैना आणि स्टार स्पिनर हरभजन सिंहने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतल्याने संघासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. अशातच पहिल्या सामन्यात संघासाठी चांगली कामगिरी करणारा स्टार खेळाडू अंबाती रायडू दिल्ली कॅपिटल्ससोबतचा सामना खेळू शकणार नसल्याची माहिती संघ व्यवस्थापकांकडून देण्यात आली आहे.
आयपीएल 2020 च्या सलामीच्या सामन्याचा हिरो अंबाती रायडू राजस्थान विरूद्धच्या सामन्यातही खेळू शकला नव्हता. याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा 16 धावांनी पराभव झाला होता. सीएसकेच्या सीईओनी रायडूला झालेली दुखापत जास्त गंभीर नसल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'रायडू हेमस्ट्रिंग इंज्युरीचा सामना करत आहे. त्यामुळे तो आणखी एक सामना खेळू शकणार नाही. पण त्यानंतर मात्र रायडू त्याच जोमाने खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.'
दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर; पुढील दोन सामने खेळण्यावर प्रश्नचिन्ह
दिल्ली विरूद्धच्या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाला आराम करण्याची संधीही मिळणार आहे. कारण दिल्लीसोबतच्या सामन्यानंतर सीएसकेचा संघ थेट एक आठवड्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी सनरायझर्स हैदराबादच्या विरूद्ध खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.
सुरेश रैना आयपीएल सुरु होण्यापूर्वीच यंदाच्या सीझनमधून माघार घेत भारतात परतला होता. रैनाच्या गैरहजेरीत सीएसकेसाठी मधल्या फळीतील फलंदाजांपैकी अंबाती रायडू एक महत्त्वाचा भाग मानला जात होता. रायडूने आयपीएलच्या 13व्या सीझनच्या पहिल्या सामन्यात 71 धावा करत संघासाठी उत्तम कामगिरी केली होती.
मॅन ऑफ द मॅचचा मान मिळाल्यानंतर रायडू म्हणाला होता की, 'आम्ही लॉकडाऊनमध्ये ट्रेनिंग करत होतो. मला शानदार वापसी करण्याती इच्छा होती आणि त्यासाठी मी स्वतःला पूर्णपणे तयार ठेवलं होतं.'
दरम्यान, अंबाती रायडूला इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड कपसाठी संघात स्थान मिळालं नव्हतं. रायडूने यावर आक्षेप घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर मात्र राहुल द्रविडने दिलेल्या सल्ल्यानंतर त्याने आपला निर्णय बदलला होता.
महत्त्वाच्या बातम्या :