IPL 2020, SRH vs DC : मॅन ऑफ द मॅच ठरलेला राशिद खान भावूक; दिवंगत आई-वडिलांना दिलं यशाचं श्रेय
आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील 11वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात बाजी मारत हैदराबादने दिल्लीचा पराभव केला.
IPL 2020 : इंडियन प्रिमीयर लीगच्या 11व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 15 धावांनी पराभव केला. सनरायझर्स हैदराबादचा स्टार गोलंदाज राशिद खानने प्रतिस्पर्धी संघाच्या तीन खेळाडूंना अवघ्या 14 धावांतच माघारी धाडलं. त्यामुळे या विजयाचा मानकरी राशिद ठरला. हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करत चार विकेट्स गमावत 162 धावा केल्या. परंतु, दिल्लीला हैदराबादने दिलेलं आव्हान पूर्ण करता आलं नाही आणि 15 धावांनी दिल्ली विजयापासून दूर राहिली.
मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाल्यानंतर राशिद खान म्हणाला की, 'गेलं दीड वर्ष माझ्यासाठी फार कठीण होतं. आधी मी माझ्या वडिलांना गमावलं आणि गेल्या तीन-चार महिन्यांआधी आईला. ती माझी सर्वात मोठी फॅन होती. आजचा विजय त्या दोघांच्या नावे. जेव्हाही मला यश मिळायचं, तेव्हा माझी आई रात्रभर माझ्यासोबत गप्पा मारायची.'
राशिद पुढे बोलताना म्हणाला की, चांगली खेळी करण्यासाठी त्याच्यावर कोणताच दबाव नव्हता. राशिद म्हणाला की, 'मी कधीच ताण घेत नाही की, मला चांगलं खेळायचं आहे. मी स्वतःला शांत ठेवतो आणि माझे बेसिक्स क्लियर ठेवतो. संघाच्या कर्णधाराने माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवला आहे आणि मला वाटेल तशी गोलंदाजी करण्याची संधी दिली आहे.'
आयपीएलमध्ये राशिद खानच्या सर्वश्रेष्ठ प्रदर्शन
2017 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अफागानिस्तानचा क्रिकेटर राशिद खानने 49 सामन्यांमध्ये 59 विकेट्स घेतले आहेत. या सामन्याआधी त्याची उत्तम खेळी म्हणजे, 19 धावा देत तीन विकेट्स घेतले होते. आयपीएलच्या सर्वात घातक गोलंदाजांमध्ये राशिद खानचा समावेश होतो. आयपीएलमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट 6.51 इतका आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
सनरायझर्स हैदराबादचा पहिला विजय; दिल्ली कॅपिटल्सचा 15 धावांनी पराभव