IPL 2020 DC vs KKR : चुरशीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाइट रायडर्सवर विजय
कोलकाताच्या इयॉन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी यांनी शेवटच्या काही षटकांमध्ये 30 चेंडूत 78 धावांची भागीदारी करत सामन्यात रंगत आणली. पण त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली,
DC vs KKR: अतिशय चुरशीच्या अशा सामन्यात शनिवारी दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला. आयपीएल 2020 मधील दिल्ली कॅपिटल्सचा हा तिसरा विजय होता. दिल्ली कॅपिटल्स संघाने शारजाच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करत 228 धावांचे मोठे लक्ष्य दिले. पण कोलकाता नाइट रायडर्सला या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही. कोलकाताला 20 षटकांत 210 धावाचं बनवता आल्या.
दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 229 धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात खराब झाली. सुनील नारायण 3 धावांवर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि नितीश राणा यांनी 64 धावांची भागीदारा रचली. नितीश राणाने फटकेबाजी करत 35 चेंडूत 58 धावा केल्या. त्यानंतर आंद्रे रसेल (13), दिनेश कार्तिक (6) आणि पॅट कमिन्स (5) झटपट बाद झाले. नितीश राणा बाद झाल्यावर दिल्ली सामना जिंकणार असं वाटत होतं. मात्र इयॉन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी यांनी शेवटपर्यंत लढा दिला. 229 सारख्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना इयॉन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी यांनी शेवटच्या काही षटकांमध्ये 30 चेंडूत 78 धावांची भागीदारी करत सामन्यात रंगत आणली. पण अखेर कोलकाता नाइट रायडर्सला 18 धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. सामन्यात इयॉन मॉर्गनने 18 चेंडूत 5 षटकारांसह 44 धावा केल्या, तर राहुल त्रिपाठीने 16 चेंडूत 36 धावा केल्या.
दरम्यान सुरुवातीला नाणेफक हरुनही फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दोघांनी अर्धशतकी सलामी दिली. अलवघ्या 5.5 षटकांत 56 धावा केल्या. धवन 26 धावांवर बाद झाला. पृथ्वी शॉने आपले अर्धशतक पूर्ण केले, पण नंतर तोही 66 धावांवर बाद झाला. त्याने 4 चौकार आणि 4 षटकार लगावले.
ऋषभ पंतनेही तुफान फटकेबाजी करत अवघ्या 17 चेंडूत 38 धावा केल्या. त्यात 5 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने मात्र तुफान फटकेबाजी केली. त्याने फक्त 38 चेंडूत नाबाद 88 धावा केल्या. या फटकेबाजी जोरावर दिल्लीने २२८ धावा केल्या. रसेलने सर्वाधिक २ बळी टिपले.