Hardik Pandya : मुंबई इंडियन्सची पराभवाची मालिका सुरुच, सातव्या पराभवाचं खापर हार्दिक पांड्यानं कुणावर फोडलं?
IPL 2024 : आयपीएलमध्ये काल झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सला लखनौ सुपर जाएंटसकडून पराभव स्वीकारावा लागला.
MI vs LSG, IPL 2024 : मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये आणखी एक सामना गमावला. हार्दिक पांड्यांच्या नेतृत्त्वातील टीमला त्यांच्या लौकिकाकाप्रमाणं कामगिरी करता आलेली नाही. आयपीएलमध्ये काल झालेल्या 48 व्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) लखनौनं पराभूत केलं. लखनौ सुपर जाएंटसनं (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्सवर चार विकेट राखून विजय मिळवला. सातव्या पराभवानंतर हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) मुंबईचं नेमकं काय चुकलं हे सांगितलं आहे. मुंबईनं फलंदाजी करताना सुरुवातीला चार विकेट गमावल्या हेच पराभवाचं मुख्य कारणं असल्याचं हार्दिक पांड्या म्हणाला.
मुंबई इंडियन्सला केएल. राहुलच्या लखनौ सुपर जाएंटसनं सुरुवातीला चार धक्के दिले. मुंबईच्या 28 धावांवर चार विकेट पडल्या होत्या. लखनौच्या मोहसीन खान, मार्कस स्टॉयनिस आणि नवीन उल हक यांनी मुंबईला बॅकफूटवर ढकललं होतं.
रोहित शर्मा 4 धावा, सूर्यकुमार यादव 10 धावा, तिलक वर्मा 7 धावा करुन बाद झाले आणि हार्दिक पांड्या शुन्यावर बाद झाला. यानंतर इशान किशान 32, नेहाल वढेरा 46 आणि टीम डेविडनं 35 धावा केल्या.
पॉवरप्लेमध्ये प्रमुख विकेट गमावल्यानंतर मॅचमध्ये पुन्हा कमबॅक करणं शक्य झालं नाही, असं हार्दिक पांड्यानं सांगितलं. हार्दिक पांड्या म्हणाला की पॉवरप्लेमध्ये विकेट गमावणं हे पुन्हा मॅचमध्ये कमबॅक करण्यासा प्रमुख अडथळा ठरलं. लवकर विकेट गेल्यानं ते शक्य झालं नाही. आम्हाला जिथं चांगली कामगिरी करायची होती तिथं आम्ही अपयशी ठरलो, असं हार्दिक पांड्या म्हणाला.
हार्दिक पांड्या पुढे म्हणाला की तुम्हाला बॉल व्यवस्थित पाहून फटकेबाजी करायची होती. खेळपट्टी देखील चांगली होती. मोठे फटके मारण्यासाठी बॉल बॅटवर येत होता. आम्हीच ती संधी गमावली असं, हार्दिक पांड्यानं म्हटलं.
नेहाल वढेराचं कौतुक
हार्दिक पांड्यानं लखनौ विरुद्ध चागंली फलंदाजी करणाऱ्या नेहाल वढेराचं देखील कौतुक केलं. हार्दिक पांड्या म्हणाला की, नेहाल वढेरानं राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जाएंटसविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी प्रमाणं यंदा देखील तो चमकदार कामगिरी करतोय. संघनिवडीच्या समीकरणामुळं तो लवकर खेळला नाही. नेहाल वढेराकडील टॅलेंट पाहता तो मुंबई आणि देशासाठी दीर्घकाळ योगदान देईल, असं हार्दिक पांड्या म्हणाला.
दरम्यान, मुंबई इंडियन्स 10 सामन्यांमध्ये 7 पराभव आणि 3 विजयांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.
संबंधित बातम्या
MI Playoff Chances : 7 पराभवानंतर मुंबईचं प्लेऑफमधील आव्हान संपलं? जाणून घ्या MI ची संधी