GT vs KKR Match Highlights : कोलकात्याचा थरारक विजय! सलग 5 षटकार लगावत रिंकू सिंहने गुजरातला हरवले
GT vs KKR Match Highlights : अखेरच्या षटकात लागोपाठ पाच षटकार लगावत रिंकू सिंह याने कोलकात्याला थरारक विजय मिळवून दिला.
GT vs KKR Match Highlights : अखेरच्या षटकात लागोपाठ पाच षटकार लगावत रिंकू सिंह याने कोलकात्याला थरारक विजय मिळवून दिला. वेंकटेश अय्यर याने विस्फोटक अर्धशतक झळकावत इम्पॅक्ट पाडला होता, त्यानंतर अखेरच्या षटकात रिंकूने सलग पाच षटकार लगावत कोलकात्याला विजय मिळवून दिला. कोलकात्याचा हा सलग दुसरा विजय होय.. तर गुजरातचा यंदाच्या स्पर्धेतील पहिला विजय होय. गुजरातने दिलेले 205 धावांचे आव्हान कोलकात्याने अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. गुजरातकडून कर्णधार राशिद खान याने हॅट्ट्रिक घेतली.
205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. सलामी फलंदाज गुरबाज आणि नारायण जगदिशन झटपट बाद झाले. गुरबाज 15 तर जगदिशन याने 6 धावांची खेळी केली. त्यानंतर वेंकटेश अय्यर आणि कर्णधार नीतीश राणा यांनी कोलकात्याचा डाव सावरला. नीतीश राणा येन 45 धावांची झटपट खेळी केली. या खेळीत राणा याने 3 षटकार आणि चार चौकार लगावले. तर वेंकटेश अय्यर याने 83 धावांची खेळी केली. या खेळीत वेंकटेश अय्यर याने पाच षटकार आणि आठ चौकार लगावले. वेंकटेश अय्यर बाद झाल्यानंतर कोलकात्याचा डाव कोसळळा. एकापाठोपाठ एक विकेट पडल्या. राशिद खान याने हॅट्ट्रिक घेत गुजरातच्या विजयाच्या आशा उंचावल्या. आंद्रे रसेल, नारायण आणि शार्दूल ठाकूर यांना राशिद खान याने तंबूचा रस्ता दाखवला. हा सामना कोलकात्याच्या हातून गेला असेच वाटत होते. पण अखेरच्या षटकात रिंकू सिंह याने करिश्माई फलंदाजी केली. यश दयाल याच्या अखेरच्या पाच चेंडूवर रिंकू सिंह याने सलग पाच षटकार लगावत कोलकात्याला थरारक विजय मिळवून दिला.
दरम्यान, प्रथम फंलदाजी करताना साई सुदर्शन आणि विजय शंकर यांच्या अर्धशतकाच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 204 धावांपर्यंत मजल मारली. विजय शंकर याने अखेरच्या षटकात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. विजय शंकर याने 24 चेंडूत 63 धावांची वादळी खेळी केली.
साई सुदर्शन पुन्हा चमकला -
पहिल्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणाऱ्या साई सुदर्शन याने मागील दोन्ही सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. साई सुदर्शन याने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकाला गवसणी घातली. केन विल्यमसनच्या दुखापतीमुळे साई सुदर्शन याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले होते, त्याने या संधीचे सोने केले. गुजरातचा संघ अडचणीत सापडला तेव्हा साई सुदर्शन याने विस्फोटक अर्धशतक झळकावले. साई सुदर्शन याने 38 चेंडूत 53 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन चौकार आणि दोन षटकार लगावले. आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील हे त्याचे दुसरे अर्धशतक होय.
विजय शंकरचा फिनिशिंग टच -
आघाडीचे फंलदाज बाद झाल्यानंतर विजय शंकर याने मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडत तांडव घातला. विजय शंकर याने अखेरच्या दोन षटकात धावांचा पाऊस पाडला. त्याने अवघ्या 24 चेंडूत 63 धावांची खेळी करत फिनिशिंग टच दिला. विजय शंकरच्या विस्फोटक खेळीच्या बळावर गुजरातने दोनशे धावांचा पल्ला पार केला. विजय शंकर याने 24 चेंडूत पाच षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 63 धावांची खेळी केली.
शुभमनची संयमी फलंदाजी -
कोलकाताविरोधात शुभमन गिल याने संयमी फलंदाजी केली. गिल याने 31 चेंडूत 39 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार लगावले. शुभमन गिल याने वृद्धीमान साहा याच्यासोबत 33 धावांची सलामी दिली. त्यानंतर साई सुदर्शन याच्यासोबत दुसऱ्याविकोटसाठी 67 धावांची भागिदारी करत गुजरातच्या डावाला आकार दिला.
इतर फलंदाजांची कामगिरी कशी?
वृ्द्धीमान साहा याने 17 चेंडूत 17 धावांची खेळी केली. यामध्ये तीन चौकार लगावले. तर अभिनव मनोहर याने आठ चेंडूत 14 धावा जोडल्या. यामध्ये त्याने तीन चौकार लगावले. मिलर तीन धावांवर नाबाद राहिला.
शुभमनचा दोन हजार धावांचा पल्ला -
गुजरताचा युवा फलंदाज शुभमन गिल याने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कोलकात्याविरोधात गिल याने आयपीएलमध्ये दोन हजार धावांचा पल्ला पार केला. गिल याने हा पराक्रम 74 व्या डावात केला. शुभमन गिल याने आयपीएलमध्ये दोन हजार धावांचा पल्ला पार करत मोठा विक्रम नावावर केलाय. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान दोन हजार धावांचा पल्ला पार करणाऱ्या फलंदाजात केएल राहुल पहिल्या क्रमांकावर आहे. राहुलयाने अवघ्या 60 डावात दोन हजार धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकर याने 63 डावात दोन हजार धावा केल्या आहेत. तर ऋषभ पंत याने 64 आणि गौतम गंभीर याने 69 डावात दोन हजार धावांचा पल्ला पार गाठलाय. सुरेश रैना याला दोन हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी 69 डावांची वाट पाहावी लागली होती. विरेंद्र सेहवाग याने 70 डावात हा कारनामा केलाय.