CSK : धाराशिवचा पठ्ठ्या धोनीसोबत मैदानात, हंगरगेकरचे आयपीएल पदार्पण
CSK : तुळजापूर येथील राजवर्धन हंगरगेकरनं याने आज आयपीएलमध्ये पदार्पण केलेय.
Rajvardhan Hangargekar CSK : धाराशिवचा जिल्ह्यातील तुळजापूर येथील राजवर्धन हंगरगेकरनं याने आज आयपीएलमध्ये पदार्पण केलेय. धोनीच्या चेन्नई चेन्नई संघात राजवर्धन हंगरगेकर याला संधी मिळाली आहे. भारताच्या अंडर 19 विश्वचषक विजयात राजवर्धन हंगरगेकर याचा मोलाचा वाटा आहे. राजवर्धन हंगरगेकर हा अष्टपैलू खेळाडू आहे. राजवर्धन हंगरगेकर याने अंडर 19 विश्वचषकात अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळेच त्याला आयपीएलसाठी चेन्नई सुपर किंग्जने 30 लाख बेस प्राईज असताना तब्बल दीड कोटी रूपये मोजून ताफ्यात घेतले होते. यंदा त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली आहे.
राजवर्धन याने आपल्या अष्टपैलू खेळीने सर्वांचे लक्ष वेधलेय. तसेच त्याच्या खेळात सातत्य आहे, त्यामुळेच त्याची चेन्नईच्या संघात निवड झाली. दु्र्देवाने राजवर्धनची क्रिकेटची आवड जोपासणारे वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं होते. युवराज सिंह, महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली, रिषभ पंत हे 19 वर्षे भारतीय संघातून खेळून पुढे स्टार झाले. खेळात सातत्य राहिले, फिटनेस राहिला तर तो भारतीय संघात दिसण्याची शक्यता आहे. तसे झालं तर हा धाराशिवचा सारख्या छोट्या शहरातल्या गुणवत्तेची मोठी ओळख ठरेल. राजवर्धन याने लहानपणी टेनिस बॉलने क्रिकेट खेळला. आधी तो फिरकीपटू होता पण वयाच्या 14 व्या वर्षापासून तो वेगवान गोलंदाज बनला. 2016-17 च्या विजय मर्चंट करंडकासाठी त्याची निवड झाली होती. येथून तो स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक तेजस मातापूरकर यांच्या नजरेत आला. नंतर अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी केली. त्यानंतर त्याला चेन्नईच्या संघात स्थान देण्यात आले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून खेळताना त्याने चमकदार कमागिरी केली आहे.
राजवर्धन हंगरगेकर हा तुळजापुर येथील माजी आमदार साहेबराव हंगरगेकर यांचा नातू आहे. शिक्षण आणि क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी तो पुण्यात गेला. तिथे काही वर्ष मेहनत घेतली. भारतीय क्रिकेट संघात खेळायचं हे स्वप्न उराशी ठेवून राजवर्धनने तीन वर्ष घाम गाळला. कोविडच्या काळातही त्याने कसून सराव केला. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर राजवर्धन हंगरगेकर अंडर 19 संघाचा भाग झाला. तिथे त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले होते. आज त्याला चेन्नई संघात प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आलेय.
राजवर्धन याने अंडर-19 मध्ये वेधलं होतं क्रीडाप्रेमींचं लक्ष
अंडर-19 वर्ल्डकपमधील राजवर्धन हंगरगेकरच्या कामगिरीनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानं केवळ गोलंदाजीनंच नव्हे तर, फलंदाजीनंही प्रेक्षकांना आकर्षित केल होतं.
अंडर-19 वर्ल्डकपमध्ये आयरलँड विरुद्ध 45 व्या षटकात फलंदाजीसाठी आलेल्या राजवर्धन यानं तुफानी खेळी केली होती. त्यानं 17 चेंडूंमध्ये नाबाद 39 धावा तडकवल्या होत्या. यात एक चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. अखेरच्या षटकात त्याने सलग 3 षटकार ठोकून सर्वांच लक्ष वेधले होते.