IPL 2023 : पंत ते बुमराह, 'हे' स्टार खेळाडू आयपीएलला मुकणार, पाहा संपूर्ण यादी
IPL 2023 : काही स्टार खेळाडू मुकण्याची शक्यता आहे. यामध्ये दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत, मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.
IPL 2023 : आयपीएलच्या आगामी हंगामाला अवघ्या दोन आठवड्याचा कालावधी उरला आहे. प्रत्येक संघांनी आपापली तयारी सुरु केली आहे. पण यंदाच्या आयपीएलला काही स्टार खेळाडू मुकण्याची शक्यता आहे. यामध्ये दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत, मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. त्याशिवाय आणखी काही स्टार खेळाडू आयपीएलला मुकण्याची शक्यता आहे. पाहूयात त्याबाबत सविस्तर माहिती..
ऋषभ पंत -
2022 वर्षाच्या अखेरीस यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये पंत थोडक्यात बचावला. मुंबईतील रुग्णालयात पंतवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तो जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे. पंतला अद्याप आपल्या पायावरही उभा राहते येत नाही. त्यामुळे ऋषभ पंत यंदाच्या आयपीएलला मुकणार आहे. ऋषभ पंतची अनुपस्थिती हा दिल्लीसाठी मोठा धोक्का मानला जातोय.
जसप्रीत बुमराह -
दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह आयपीएलमधून बाहेर गेलाय. मागील सात ते आठ महिन्यापासून जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त आहे. न्यूझीलंडमध्ये नुकतीच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तो सध्या दुखापतीतून सावरत आहे. जसप्रीत बुमराह आयपीएल खेळणार नसल्याने मुंबईच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबईसाठी दिलासादायक बाब म्हणजे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर खेळणार आहे.
श्रेयस अय्यर -
आयपीएल 2023 मध्ये श्रेयस अय्यरच्या खेळण्याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. अहमदाबाद कसोटीतही श्रेयस अय्यर फलंदाजीला आला नव्हता. त्यानंतर श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत सातत्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. अय्यरची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत कोणताही माहिती समोर आलेली नाही. पण श्रेयस अय्यर एकदिवसीय मालिकेत आणि आयपीएलमध्ये खेळणार का? याकडे लक्ष लागलेय. अय्यर आयपीएलमधून बाहेर पडला तर कोलकात्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
स्टिव स्मिथ -
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथ याने आयपीएलमधून माघार घेतली आहे. वर्कलोडचं कारण देत स्मिथने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल लिलावातही स्मिथने आपले नाव दिलेले नव्हते. त्यामुळे यंदा आयपीएलमध्ये स्मिथ खेळताना दिसणार नाही.
पॅट कमिन्स -
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली आहे. वर्कलोडचं कारण देत पॅट कमिन्सने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. हा कोलकाता संघाला मोठा धक्का मानला जातोय. पण लॉकी फर्गुसनला संघात घेत कोलकात्याने डोकेदुखी दूर करण्याचा प्रयत्न केलाय.
प्रसिद्ध क्रृष्णा -
गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध क्रृष्णा दुखापतीशी दोन हात करत आहे. प्रसिद्ध क्रृष्णाला पाठदुखाचा त्रास होतोय. त्यातून तो अद्याप सावरलेला नाही, त्यामुळे त्याने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा राजस्थानसाठी मोठा धक्का मानला जातोय.
कायले जेमिसन
न्यूझीलंडचा अष्टपैलू कायले जेमिसन यानेही आयपीएलमधून माघार घेतली आहे. दुखापतीमुळे जेमिसन आयपीएलमध्ये खेळणार नाही. हा चेन्नईसाठी धक्का मानला जातोय.
जाय रिर्चडसन -
जसप्रीत बुमराह याच्यानंतर मुंबईचा जाय रिर्चडसनही आयपीएलला मुकणार आहे. दुखापतीमुळे रिर्चडसन याने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
जॉनी बेअरस्टो -
पंजाबचा स्टार फलंदाज जॉनी बेअरस्टोच्या (Jonny bairstow) यंदाच्या हंगामात खेळणार का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. पंजाब किंग्जचा फलंदाज जॉनी बेअरस्टो इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून (ECB) वैद्यकीय मंजुरीची वाट पाहत आहे. त्याशिवाय गेल्या वर्षी झालेल्या दुखापतीतून अजूनही सावरत आहे.