(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिल्लीचं मुंबईपुढे 258 धावांचं विशाल आव्हान, जेक मॅकगर्कचं तुफानी अर्धशतक
DC vs MI : जेक मॅकगर्कच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 257 धावांचा डोंगर उभारला आहे.
DC vs MI : जेक मॅकगर्कच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 257 धावांचा डोंगर उभारला आहे. दिल्लीकडून जेक मॅकगर्क यानं 27 चेंडूत 84 धावांची वादळी खेळी केली. त्याशिवाय स्टब्स आणि शाय होप यांनीही झंझावती फलंदाजी केली. मुंबईकडून सर्व गोलंदाज फेल ठरले. मुंबईला विजयासाठी 258 धावांचं आव्हान मिळालं आहे.
दिल्लीची वादळी सुरुवात -
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण दिल्लीच्या सलामी फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं दाखवून दिलं. जेक मॅकगर्क यानं मुंबईची गोलंदाजी फोडून काढली. जेक मॅकगर्क यानं बुमराह, हार्दिक, ल्यूक आणि तुषारा यांना सोडलं नाही. मॅकगर्कने प्रत्येक चेंडूवर फटकेबाजी करत दिल्लीची धावसंख्या वाढवली. मॅकगर्क यानं अवघ्या 15 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलं. मॅकगर्कच्या वादळी फलंदाजीच्या दोरावर दिल्लीने पहिल्या षटकांमध्ये तब्बल 92 धावांचा पाऊस पाडला. मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांनी 7.3 षटकांत 114 धावांची भागिदारी केली. पियुष चावलाने मॅकगर्क याला बाद करत मुंबईला दिलासा दिला.
मॅकगर्कचं झंझावती अर्धशतक -
‘मॅकगर्क’च्या वादळासमोर मुंबईचे गोलंदाज पाचोळ्यासारखे उडाले. मॅकगर्क यानं 312 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. त्यानं अवघ्या 27 चेंडूमध्ये 84 धावांची झंझावती खेळी केली. या खेळीमध्ये मॅकगर्क यानं 6 षटकार आणि 11 चौकारांचा पाऊस पाडला. मॅकगर्क यानं दिल्लीच्या धावसंख्येचा पाया रचला. त्याला अभिषेक पोरेल यानं दमदार साथ दिली. अभिषेक पोरेल यानं 27 चेंडूणध्ये 36 धावांची खेळी केली. यामध्ये तीन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होते.
शाय होपची शानदार फलंदाजी -
मॅकगर्क आणि पोरेल बाद झाल्यानंतर शाय होप यानं वादळी फलंदाजी केली. शाय होप यानं सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. एकेरी दुहेरी धावा केल्या. पण जम बसल्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शाय होप यानं 17 चेंडूमध्ये 41 धावांचा पाऊस पाडला. होप यानं 242 च्या स्ट्राईक रेटने चोप चोप चोपलं. होपने आपल्या खेळीमध्ये पाच खणखणीत षटकार ठोकले.
स्टब्सचा फिनिशिंग टच -
ऋषभ पंत यानं 19 चेंडूत 29 धावांची खेळी करत स्टब्सला चांगली साथ दिली. ऋषभ पंत यानं आपल्या छोटेखानी खेळीमद्ये दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले. स्ट्रिस्टन स्टब्सने अखेरीस मुंबईची गोलंदाजी फोडली. स्टब्सने 25 चेंडूमध्ये 48 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि सहा चौकारांचा समावेश आहे. तर अक्षर पटेलने 6 चेंडूत 11 धावांची खेळी केली.
मुंबईची खराब गोलंदाजी -
गेराल्ड कोइत्जेच्या जागी खेळणाऱ्या ल्यूक वूड यानं खराब गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकांमध्ये 68 धावा खर्च केल्या. त्याला एक विकेट मिळाली. पियुष चावलाने चार षटकात 36 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. जसप्रीत बुमराहाने चार षटकात 35 धावा खर्च करत एक विकेट घेतली हार्दिक पांड्याची गोलंदाजी सर्वात महागडी ठरली. पांड्यानं 2 षटकात 41 धावा खर्च केल्या, त्याला एकही विकेट मिळाली नाही. मोहम्मद नबीने दोन षटकात 20 धावा देत एक विकेट घेतली.
दिल्ली कॅपिटल्सची Playing XI:
कुमार कुशाग्रा, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, मुकेश कुमार, लिजाद विलिअम्स
इम्पॅक्ट सब - रसीख, दुबे, ओत्सवाल, रिकी भुई, सुमित कुमार
मुंबई इंडियन्सची Playing XI:
रोहित शर्मा, इशान किशन, नेहाल वेढेरा, तिलक वर्मा, नेहाल वढेरा हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी पीयूष चावला, लूकी वूड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा
इम्पॅक्ट सब - सूर्यकुमार यादव, नमन धीर, सॅम्स मुलानी, ब्रेविस, कुमार कार्तिकिय