चेन्नईच्या अडचणी वाढल्या, 14 कोटींचा खेळाडू दुखापतग्रस्त, एक मायदेशी परतणार, मॅचविनरही अनफिट
CSK, IPL 2024 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सला पंजाबविरोधात घरच्या मैदानावर पराभवाचा झटका बसला.
CSK, IPL 2024 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सला पंजाबविरोधात घरच्या मैदानावर पराभवाचा झटका बसला. पण या धक्क्यापेक्षा मोठा धक्का म्हणजे पुढील काही सामन्यासाठी महत्वाचे खेळाडू उपलब्ध नसतील. यामध्ये 14 कोटींच्या मॅचविनर खेळाडूचाही समावेश आहे. त्याशिवाय दोन गोलंदाज दुखापतग्रस्त आहेत. तर एक खेळाडू मायदेशी परतणार आहे. त्यामुळे चेन्नईच्या अडचणी वाढल्या आहेत. चेन्नईनं यंदाच्या हंगामात दहा सामन्यात पाच विजय मिळवले आहेत. दहा गुणांसह चेन्नईचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी चेन्नईला उर्वरित 4 सामन्यातील तीन सामने जिंकावेच लागतील. पण महत्वाचे चार गोलंदाजांची अनुपस्थितीने चेन्नईच्या अडचणी वाढवल्या आहेत.
गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला बुधवारी पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला.घरच्या मैदानावर पंजाब किंग्सने सात विकेटनं चेन्नईचा पराभव केला. या पराभवामुळे चेन्नईचं प्लेऑफचं गणित बिघडलेय. कारण, चेन्नईचे काही खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत, तर काही खेळाडू मायदेशी परतणार आहेत. चार महत्वाच्या मॅचविनर खेळाडूंमुळे CSK च्या चिंता वाढल्या आहेत.
14 कोटींचा खेळाडू दुखापतग्रस्त -
14 कोटी रुपये देऊन संघात कायम ठेवलेल्या दीपक चाहरला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. पंजाबविरोधात गोलंदाजी करताना दीपक चाहर दुखापतग्रस्त झाला. त्यानं फक्त दोन चेंडू गोलंदाजी केली, त्यानंतर दुखापतीमुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. त्यानंतर चाहर मैदानावर परतलाच नाही. दीपक चाहर सुरुवातीच्या षटकात धावगती रोखतोच, त्याशिवाय विकेटही घेत असतो. त्यामुळे चाहरची दुखापत चेन्नईसाठी डोकेदुखी ठरू शकते.
मथीशा पथीरानाही दुखापतग्रस्त -
चेन्नईचा हुकमी एक्का मथीशा पथिराना यालाही दुखापत झाली आहे. घोट्याला दुखापत झाल्यामुळे पथिराना पंजाबविरोधातील सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. त्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत माहिती समोर आलेली नाही. पण पथीरानाची दुखापत चेन्नईची चिंता वाढवणारी आहे.
तुषार देशपांडे आजारी -
पंजाबविरोधात तुषार देशपांडे प्लेईंग 11 चा भाग नव्हता. तुषार देशपांडे आजारी असल्यामुळे त्याला प्लेईंग 11 मध्ये खेळवण्यात आलेले नाही. त्याचं आजारपण नेमकं काय आहे? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण तुषार देशपांडेने आतापर्यंत शानदार गोलंदाजी केली आहे. तुषारची अनुपस्थिती चेन्नईसाठी मोठा झटका मानला जातोय.
मुस्तफिजुर मायदेश परतणार -
बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून मुस्तफिजुर रहमान याला बोलवणं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, यापुढील आयपीएलसाठी मुस्तफिजुर उपलब्ध नसणार आहे. 2 कोटी रुपयात विकत घेतलेल्या बांग्लादेशी पेसरचा या सीजनमधील हा शेवटचा सामना होता. आता तो बांग्लादेशी टीममध्ये परतलाय. तिथे झिम्बाब्वे विरुद्ध T20 सीरीज खेळणार आहे. दीपक चाहर, पथिराना, तुषार याच्यानंतर मुस्तफिजुरही नसल्यानं चेन्नईची गोलंदाजी कमकुवत झाल्याचं दिसत आहे.