CSK vs KKR: कोलकात्याचे चेन्नईसमोर 172 धावांचे लक्ष्य; दिनेश कार्तिकची अखेरच्या षटकांत स्फोटक खेळी
CSK vs KKR: कोलकात्याकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 45 धावा केल्या. पण, अखेरच्या षटकांत दिनेश कार्तिकने 11 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 26 धावांची स्फोटक खेळी खेळली.
Chennai vs Kolkata: अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या आयपीएल 2021 च्या 38 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्यांदा फलंदाजी करत चेन्नई सुपर किंग्जला 172 धावांचे लक्ष्य दिलंय. कोलकात्याकडून राहुल त्रिपाठीने 45 धावा केल्या. अखेरच्या षटकात दिनेश कार्तिकने 11 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 26 धावांची स्फोटक खेळी खेळली.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शुभमन गिल पाच चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 9 धावा केल्यावर धावबाद झाला. यानंतर उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला वेंकटेश अय्यर 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 15 चेंडूंचा सामना केला आणि एकूण तीन चौकार मारले.
यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला इऑन मॉर्गन काही खास कामगिरी करू शकला नाही. तो 14 चेंडूत आठ धावांवर बाद झाला. फाफ डु प्लेसिसने बाऊंड्री लाईनवर त्याचा शानदार झेल घेतला. मात्र, दुसऱ्या टोकाला राहुल त्रिपाठीने एक बाजू लावून धरत फटकेबाजी सुरुच ठेवली आणि केकेआरला दबावात येऊ दिलं नाही. त्याने 33 चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 45 धावा केल्या.
मॉर्गन बाद झाल्यानंतर नितीश राणा क्रीजवर आला. राणाने पहिल्यांदा आंद्रे रसेलसोबत 36 धावांची भागीदारी केली. रसेलने 15 चेंडूत 20 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या फलंदाजीतून दोन चौकार आणि एक षटकार आला. त्याला शारदल ठाकूरने बोल्ड केले. त्याचवेळी नितीश राणा 37 धावांवर नाबाद राहिला. राणाने 27 चेंडूंचा सामना करताना तीन चौकार आणि एक षटकार मारला. अखेरीस दिनेश कार्तिकने 11 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 26 धावांची स्फोटक खेळी खेळली. शेवटच्या तीन षटकांत राणा आणि कार्तिकने वेगवान धावा केल्या आणि धावसंख्या 170 च्या पुढे नेली.
चेन्नईकडून जोश हेजलवूड आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी दोन बळी घेतले. तर रवींद्र जडेजाला एक यश मिळाले. ड्वेन ब्राव्होच्या जागी संघात आलेल्या सॅम कुर्रनसाठी आजचा दिवस खास नव्हता. त्याने चार षटकांत एकही विकेट न घेता 56 धावा दिल्या.