Coronavirus | IPL 2020 रद्द झाल्यास मोठं नुकसान, पाच मोठे फटके कोणते?
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. याचा परिणाम जगभरातील अनेक खेळांच्या स्पर्धांवर झाला आहे. अशातच आता कोरोनामुळे आयपीएल 2020 पार पडणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे जगभरातील सर्वच खेळांच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. एवढचं नाहीतर खेळांमधील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या ऑलिंम्पिकचं आयोजनही पुढिल वर्षी करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. क्रिकेटवरही कोरोनाचा परिणाम दिसून येत आहे. आयपीएलही रद्द होण्याच्या मार्गावर आहे. सध्या देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, यंदा आयपीएल रद्द होणार असल्याच्या शक्यताही वर्तवण्यात येत आहेत. परंतु, जर यंदाच्या वर्षी आयपीएल झालं नाही. तर त्यामुळे क्रिकेट विश्वात अनेक परिणाम दिसून येतील.
खेळाडूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार?
आयपीएल सीझन 2020साठी 2019च्या डिसेंबरमध्येच खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली होती. ज्यामध्ये खेळाडूंवर कोट्यावधी रूपयांची बोली लावण्यात आली होती. परंतु, जर आयपीएल झालं नाही, तर या खेळाडूंना या सीझनसाठी एक रूपयाही दिला जाणार नाही. दरम्यान, हे खेळाडू पुढिल सीझनमध्ये फ्रेंचाइजीसाठी त्याच किमतीवर खेळतील. सर्वाधिक बोली लागलेल्या 5 खेळाडूंमध्ये पॅट कमिंस (15.5 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (10.75 कोटी), क्रिस मोरिस (10 कोटी), शेल्डन कॉटरेल (8.5 कोटी) आणि नॅथन कुल्टर नाइल (8 कोटी) यांचा समावेश आहे.
कशी होणार टी-20 वर्ल्ड कपची तयारी?
ज्यावर्षी टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन होणार असतं, त्यापूर्वी आयपीएलचं आयोजन सर्व संघांच्या तयारीसाठी खास योगदान देतं. भारतात डोमेस्टिक लेव्हलवर फारशा टी-20 मॅचेस खेळवल्या जात नाहीत. अशातच टी-20 वर्ल्डकपआधी इंडियन टीम मॅनेजमेंटसाठी खेळाडूंच्या तयारीची खास संधी होती. खेळाडूंना टी-20 वर्ल्डकपसाठी 14 हून अधिक मॅचेसमध्ये प्रॅक्टिस करण्याची संधी येथे मिळते. परंतु, जर आयपीएल रद्द झाली, तर मात्र खेळाडूंना प्रॅक्टिससाठी संधी मिळणार नाही.
कशी होणार संघाची बांधणी?
भारतीय संघ टी-20 क्रिकेटमध्ये अप्रतिम खेळी करत असला तरिदेखील मिडिल ऑर्डर आणि खासकरून विकेटकीपर आणि फलंदाजांबाबत अजुनही चिंता आहे. कर्णधार विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांचा संपूर्ण प्लान आयपीएलवर अवलंबून होता. त्यांना आशा होती की, आयपीएलनंतर एक योग्य टीम युनिट तयार केली जाईल. अशातच जर आयपीएलचं आयोजन रद्द करण्यात आलं तर संघाची टी-20 वर्ल्डकपसाठी तयारी कशी होणार हा प्रश्न उपस्थित होणार आहे.
पंत किंवा राहुलपैकी कोण असेल विकेटकीपर?
आयपीएल रद्द झालं तर सर्वांच्या मनात एक प्रश्न नक्कीच उपस्थित होणार आहे. तो म्हणजे, भारतीय संघासाठी विकेटकिपिंग कोण करणार? भरताचा माजी कर्णधार एमएस धोनी गेल्या वर्षभरापासून भारतीय संघासाठी खेळलेला नाही. अशातच टी-20 वर्ल्डकपआधी धोनीकडे कोणतीही मॅच प्रॅक्टिस नाही. जर आयपीएल रद्द झालं तर केएल राहुलसोबतच ऋषभ पंतही टी-20 वर्ल्डकपमध्ये फर्स्ट-चॉइस विकेटकीपर असण्याची शक्यता आहे.
दिग्गज खेळाडूंचं करिअर संपुष्टात?
वर्ल्डकप क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, जे नॅशनल टीममध्ये पुनरागमन करण्यासाठी आयपीएल 2020वर अवलंबून होते. यामध्ये सर्वात पहिलं नाव येतं, ते म्हणजे, एमएस धोनी. त्यानंतर एबी डिविलियर्स, सुरेश रैना आणि दिनेश कार्तिक यांसारखे अनेक खेळाडू आहेत. जे आपल्या क्रिकेट करिअरला फुलस्टॉप लावण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान महेंद्र सिंह धोनीचे फॅन्स वर्ल्डकप 2019 नंतरपासूनच धोनी मैदानावर कधी उतरणार याची वाट पाहत आहेत. जर यंदाचं आयपीएल पार पडलं नाही तर मात्र धोनीच्या फॅन्सना आणखी बरेच दिवस वाट पाहावी लागू शकते.
संबंधित बातम्या :
IPL 2020 | यंदाचा IPL सिझन पुढील आदेशापर्यंत रद्द, सौरभ गांगुलीची माहिती
आयपीएल खेळण्याची धोनीची इच्छा; मागील 10 वर्षांत पहिल्यांदाच घेतलेली एवढी मेहनत
विराटला टीम इंडियामध्ये संधी देण्यास धोनीचा विरोध होता : दिलीप वेंगसरकर
Wimbledon | यंदा विम्बल्डनचं आयोजन नाही, दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच स्पर्धा रद्द