Corona Crises | कोरोना संकटात ब्रेट लीची 41 लाखांची मदत; भारतीयांसाठी शेअर केली खास पोस्ट
ब्रेट लीने मंगळवारी भारतीय रुग्णालयात ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी 1 बिटकॉइन म्हणजे सुमारे 41 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. आयपीएलमुळे ब्रेट ली सध्या भारतात आहे.
नवी दिल्ली : भारत सध्या कोरोनाच्या अतिवाईट परिस्थितीचा सामना करत आहे. लाखो लोक, प्रशासन रोज अनंत अडचणींचा सामना करत आहेत. देशातील बर्याच रुग्णालयांमध्ये यावेळी ऑक्सिजनची मोठी कमतरता भासत आहे. ऑक्सिजनअभावी हजारो लोक आपला जीव गमावत आहेत. अशा परिस्थितीत देश-विदेशातील सर्व लोक मदतीचा हात पुढे करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने मंगळवारी भारतातील रुग्णालयात ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी 1 बिटकॉइन म्हणजे सुमारे 41 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. आयपीएलमुळे ब्रेट ली सध्या भारतात आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने भारताला मदत करण्यासाठी 50,000 डॉलर्स म्हणजे सुमारे 37 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
ब्रेट लीचा ट्विटरवर भावनात्मक संदेश
ब्रेट लीनेही ट्विटरवर भारतीयांसाठी एक भावनिक मेसेज शेअर केला आहे. त्यांने लिहिले की, "भारत माझ्यासाठी नेहमीच दुसरं घर राहिलं आहे. माझ्या प्रोफेशनल करिअर आणि निवृत्तीनंतर मला इथल्या लोकांकडून खुप प्रेम मिळालं. म्हणून भारतीयांचं माझ्या ह्रदयात खास स्थान आहे. कोरोना साथीमुळे उद्भवणारी परिस्थिती पाहून फार वाईट वाटतंय. आता एकत्र होण्याची वेळ आली आहे. जास्तीत जास्त गरजू लोकांना मदत करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे."
Well done @patcummins30 🙏🏻 pic.twitter.com/iCeU6933Kp
— Brett Lee (@BrettLee_58) April 27, 2021
लोकांना कोरोनाबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
ब्रेट लीने या कठीण परिस्थितीत आपले कर्तव्य बजावणाऱ्या फ्रंटलाईन वॉरिअर्सचेही आभार मानले. लोकांना घरीच राहावे, मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंग नियमाचं पालन करावे, असं आवाहन केले. तसेच पॅट कमिन्सने मदतीचा हात पुढे केल्याबद्दल त्याचंही ब्रेटलीने कौतुक केलं.
पॅट कमिन्सने पुढाकार घेतला
यापूर्वी सोमवारी ऑस्ट्रेलिया आणि कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने 37 लाख रुपयांची देणगी दिली आणि इतरांना मदतीसाठी आवाहन केले. त्यांच्या या निर्णयाचे जगभरातून कौतुक होत आहे.
परदेशी खेळाडूंनी मदतीचा हात पुढे केल्यानंतर आत भारतातील कोट्यवधी लोकांसाठी देव, हिरो, आयडल, सुपरस्टार, लिजेंड असणाऱ्यांनी पुढे येणे गरजेचं आहे. अनेक जण गाजावाजा न करता मदत करतही आहेत, मात्र आता सर्वांनी एकजुटीने कोरोनावर मात करण्याची आवश्यकता आहे.