IPL 2025 Suspend: फक्त एका आठवड्यासाठी आयपीएल स्थगित, स्पर्धा पुन्हा कधी सुरु होणार, BCCI ने दिली मोठी अपडेट
IPL 2025 Suspended: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL 2025 Suspended नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगाम एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत वेळापत्रकातील बदल आणि उर्वरित सामन्यांचं आयोजन यासंदर्भातील परिस्थितीचं आकलन केल्यानंतर नवी माहिती दिली जाणार आहे. सर्व फ्रँचायजी आणि भागीदारांसोबत चर्चा केल्यानंतर स्पर्धा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयनं भारतीय सैन्यावर विश्वास दाखवत आणि सर्व घटकांच्या हितासाठी निर्णय घेण्यास कटिबद्ध असल्याचं सांगितलं.
बीसीसीआयनं या परिस्थितीमध्ये भारतासोबत असल्याचं म्हटलं आहे. आम्ही भारत सरकार आणि भारतीय सैन्याला पूर्णपणे समर्थन देतोय,असं त्यांनी म्हटलं. भारतीय सैन्यानं गेल्या 24 तासात पाकिस्तानकडून होत असलेल्या हल्ल्यांना नाकाम केलं आहे. भारतानं ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी हल्ला केल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्ताननं भारताच्या 15 शहरांवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केलाहोता.
दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील मॅच सुरक्षेच्या कारणामुळं रोखण्यात आली होती. मात्र, मॅच रोखण्याचं कारण बीसीसीआयनं तांत्रिक समस्या आणि वीज पुरवठा खंडित झाल्याचं दिलं होतं. सामना रोखल्यानंतर खेळाडूंना धर्मशालामधून नवी दिल्लीत आणण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं.
आयपीएल 2025 स्थगित करण्यापूर्वी बीसीसीआयचे अधिकारी, आयपीएलचे चेअरमन अरुण धूमल आणि सर्व 10 टीम यांना सूचना देण्यात आली होती. आयपीएलच्या 18 व्या हंगामात 58 मॅचेस झालेल्या आहेत. आता लीग स्टेजमधील 12 आणि त्यानंतर प्ले ऑफचे सामने आणि अंतिम लढत बाकी आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळं खबरदारीचा उपाय म्हणून आयपीएल स्थगित करण्यात आलं आहे. गुणतालिकेत गुजरात टायटन्स पहिल्या स्थानावर आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानी पंजाब किंग्ज असून चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्स आहे. पाचव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आहे. पंजाब आणि दिल्ली यांच्यातील धर्मशालातील सामना स्थगित करण्यात करण्यात आला होता. दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आला आहे.
प्ले ऑफची रंगत वाढली
गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज या तीन संघांकडे 16 गुण आहेत. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांकडे 14 गुण आहेत. मुंबई आणि दिल्लीचे दोन सामने बाकी आहेत. नेट रनरेट चांगलं असल्यानं मुंबई गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.




















