IPL 2021: 'या' खेळाडूसाठी बदलली 'चेन्नई सुपरकिंग्स'ची जर्सी
महेंद्र सिंह धोनी या नेतृत्त्वात मैदानात येणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स या संघाची आयपीएलच्या यंदाच्या म्हणजेच 14 व्या हंगामात अगदी सुरुवातीपासून बरीच चर्चा पाहायला मिळत आहे.
IPL 2021 महेंद्र सिंह धोनी या नेतृत्त्वात मैदानात येणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स या संघाची आयपीएलच्या यंदाच्या म्हणजेच 14 व्या हंगामात अगदी सुरुवातीपासून बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. त्यातच आता म्हणे या संघाच्या जर्सीमध्ये काही बदल करण्यात आला आहे. एका खेळाडूच्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं गेलं.
हा खेळाडू म्हणजे मोईन अली. मोईन अली यानं संघाच्या जर्सीवर असणाऱ्या दारुच्या ब्रँडचा लोगो हटवण्याची मागणीवजा विनंती केली होती. ज्यानंतर हा लोगो हटवण्यात आला. मोईन अली हा इस्लाम धर्माचं पालन करतो. ज्यामध्ये मद्य प्राशन करणं किंवा त्याचं समर्थन करणं निषेधार्ह आहे. किंबहुना अली ज्या इंग्लंडच्या संघाकडून खेळतो त्या देशाच्या क्रिकेट संघाच्या जर्सीवरही असा कोणताही लोगो नाही.
चेन्नई सुपरकिंग्सनं यंदाच्या वर्षी आयपीएलच्या नव्या हंगामासाठी नुकतीच संघाची जर्सी लाँच केली. संघाच्या स्पॉन्सर्सच्या यादीत यंदा एसएनजी 10000 चाही समावेश आहे. हा चेन्नईस्थित डिस्टीलरीजचा एक ब्रँड आहे. असं असलं तरीही अलीच्या विनंतीनंतर त्याच्या जर्सीवरुन मात्र हा ब्रँड हटवण्यात आल्याचं कळत आहे.
फखर जमांने शेन वॉटसनचा विक्रम मोडून इतिहास रचला, 'या' बाबतीत रोहित शर्माचीही बरोबरी
दरम्यान, आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी ऑलराऊंडर मोईन अली याला 7 कोटी रुपयांच्या किंमतीत चेन्नईच्या संघात समाविष्ट करुन घेण्यात आलं. मागच्या वर्षी आयपीएलमधून तो विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली असणाऱ्या बंगळुरूच्या संघातून मैदानात उतरला होता. तेव्हा आता यंदाच्या वर्षी माहीच्या चेन्नई संघात त्याची कामगिरी कशी असेल, यावर क्रीडारसिकांच्या नजरा असणार आहेत.
एकिकडे आयपीयएलचा नवा हंगाम सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच दुसरीकडे मात्र या स्पर्धेवरही कोरोनाचं सावट दिसू लागलं आहे. अनेक खेळाडूंना कोरोनानं ग्रासल्यामुळं सध्या ते क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यामुळं संघ व्यवस्थापन आणि आयपीएलच्या आयोजकांकडून कोरोनाला दूर ठेवण्यासाठीसुद्धा काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत.