फखर जमांने शेन वॉटसनचा विक्रम मोडून इतिहास रचला, 'या' बाबतीत रोहित शर्माचीही बरोबरी
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फखर जमांने 193 धावांची ऐतिहासिक खेळी रचली. यासोबतच त्याने वनडे क्रिकेटमध्ये खास स्थान मिळवलं. वनडे क्रिकेटमध्ये दोन वेळा 190 पेक्षा जास्त धावा करणारा तो दुसरा खेळाडू बनला आहे.
SA Vs PAK : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात रविवार (4 एप्रिल) रोजी खेळवलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानच्या फखर जमांने ऐतिहासिक खेळी रचली. फखर जमांने 18 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 193 धावा केल्या. या उत्तम खेळीसोबतच फखर जमांने ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनचा विक्रमही मोडला. वनडे क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वोत्तम धावांचा विक्रम पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमांच्या नावावर जमा झाला आहे.
रविवारी खेळवलेल्या सामन्यापर्यंत आव्हानाचा पाठलाग करतानाच्या सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम शेन वॉटसनच्या नावावर होता. वॉटसनने 2011 मध्ये 230 धावांचा पाठलाग करताना 96 चेंडूत 15 चौकार आणि 15 षटकारांच्या मदतीने 185 धावांची नाबाद खेळी रचली होती.
पण दक्षिण आफ्रिकाविरुद्ध फखर जमांने वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात शानदार खेळी रचली. फखर जमांने 155 चेंडूत 18 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 193 धावा केल्या. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना फखर जमांला वनडे क्रिकेटमध्ये पहिलं दुहेरी शतक करण्यापासून वंचित राहिला.
रोहित शर्माची बरोबरी
वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 190 पेक्षा जास्त धावसंख्येच्या दोन खेळी करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतक केली आहे. पण आता फखर जमां दुसरा असा खेळाडू बनला आहे, ज्याने वनडे क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा एका डावात 190 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
फखर जमां याआधी वनडे क्रिकेटमध्ये एक दुहेरी शतक केलं होत. फखर जमांने झिम्बॉब्वेविरोधात 210 धावांची खेळी रचली होती. ही दुसरी वेळ होती, जेव्हा त्याला वनडे क्रिकेटमध्ये 190 धावांपेक्षा जास्त धावांची खेळी रचण्यास यश आलं.