राजस्थान रॉयल्सकडून सनरायझर्स हैदराबादचा सात विकेट्सनी धुव्वा
हैदराबादच्या मनिष पांडेनं यंदाच्या आयपीएलमधलं सलग दुसरं अर्धशतक साजरं केलं. त्यानं 36 चेंडूत 9 चौकारांसह 63 धावा फटकावल्या.

जयपूर : स्टीव्ह स्मिथच्या राजस्थान रॉयल्सनं सनरायझर्स हैदराबादचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून यंदाच्या आयपीएलमधलं आपलं आव्हान जिवंत राखलं आहे. या सामन्यात हैदराबादनं दिलेलं 161 धावांचं माफक आव्हान राजस्थाननं सात विकेट्स आणि पाच चेंडू राखून पार केलं.
सलामीच्या अजिंक्य रहाणे आणि लायम लिव्हिंगस्टननं 78 धावांची सलामी देऊन राजस्थानच्या विजयाचा पाया रचला. रहाणेनं 39 तर लिव्हिंगस्टननं 44 धावांची खेळी उभारली. त्यानंतर संजू सॅमसननं नाबाद 48 धावा फटकावून राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
त्याआधी राजस्थान रॉयल्सच्या अचूक माऱ्यासमोर सनरायझर्स हैदराबादला 20 षटकांत आठ बाद 160 धावांचीच मजल मारता आली. हैदराबादच्या मनिष पांडेनं यंदाच्या आयपीएलमधलं सलग दुसरं अर्धशतक साजरं केलं. त्यानं 36 चेंडूत 9 चौकारांसह 63 धावा फटकावल्या. तर डेव्हिड वॉर्नरनं 37 धावांचं योगदान दिलं.
मात्र त्यानंतर राजस्थानच्या प्रभावी माऱ्यामुळे हैदराबादला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. राजस्थानच्या वरुण अॅरॉन, ओशाने थॉमस, जयदेव उनाडकट आणि श्रेयस गोपालनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडून हैदराबादच्या फलंदाजीला वेसण घातली.























