INDvsWI : विराटने झळकावलं वन डेतील 42 वं शतक, पाकिस्तानच्या जावेद मियाँदादलाही टाकलं मागे
विराट कोहलीने विंडीजविरुद्धच्या त्रिनिदाद वन डेत पाकिस्तानच्या जावेद मियाँदादचा 26 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. मियाँदादच्या नावावर विंडीजविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम जमा होता.
त्रिनिनाद : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डेत आपल्या लौकीकास साजेशी खेळी साकारली. विराटने त्रिनिदादमध्ये सुरु असलेल्या या वन डेत आपल्या वन डे कारकीर्दीतलं 42 वं शतक साजरं केलं. त्याने 112 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकारासह शतकाला गवसणी घातली.
या शतकासह विराटने आपल्या एकूण आंतरराष्ट्रीय शतकांची संख्या 67 वर नेऊन ठेवली आहे. त्याच्या या खेळीमुळे त्रिनिदाद वन डेत टीम इंडियानं मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करत आहे.
पाकिस्तानच्या जावेद मियाँदादचा विक्रमही मोडला
विराट कोहलीने विंडीजविरुद्धच्या त्रिनिदाद वन डेत पाकिस्तानच्या जावेद मियाँदादचा 26 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. मियाँदादच्या नावावर विंडीजविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम जमा होता. मियाँदादनी आपल्या वन डे कारकीर्दीत विंडीजविरुद्ध 64 डावांत 1930 धावा केल्या होत्या. मियादादने विंडीजविरुद्ध आपली अखेरचा वन डे सामना 1993 साली खेळला होता. त्रिनिदादमध्ये विराटने 19 वी धाव घेत मियाँदादचा हा विक्रम मोडीत काढला. विराटने अवघ्या 34 डावांमध्ये हा विक्रम मोडीत काढला.
वन डेत वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली - 2032 धावा जावेद मियाँदाद - 1930 धावा मार्क वॉ - 1708 धावा जॅक कॅलिस - 1666 धावा रमीझ राजा - 1624 धावा सचिन तेंडुलकर - 1573 धावा