एक्स्प्लोर
हरमनप्रीतचे शतक, T20 महिला विश्वचषकात भारताकडून न्यूझीलंडचा धुव्वा
भारताने हरमनप्रीत कौरचे शानदार शतक (103) आणि रॉड्रिग्जच्या 59 धावांच्या खेळीच्या बळावर 194 धावांचे लक्ष्य न्यूझीलंडसमोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने 9 बाद 160 धावा केल्या.

गयाना: ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने झळकावलेल्या शानदार शतकाच्या बळावर भारतीय महिला संघाने शानदार विजय प्राप्त केला. विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला संघाने न्यूझीलंडचा 34 धावांनी धुव्वा उडवला.
भारताने हरमनप्रीत कौरचे शानदार शतक (103) आणि रॉड्रिग्जच्या 59 धावांच्या खेळीच्या बळावर 194 धावांचे लक्ष्य न्यूझीलंडसमोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने 9 बाद 160 धावा केल्या. न्यूझीलंडकडून सुझी बिट्सने एकाकी झुंज देताना 67 धावांची खेळी केली. भारताच्या हेमलतानं 26 धावांत तीन आणि पूनम यादवनं 33 धावांत तीन विकेट्स घेतल्या. राधा यादवनं दोन, तर अरुंधती रेड्डीनं एक विकेट काढली.
हरमनप्रीत शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला फलंदाज
हरमनप्रीत ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला फलंदाज ठरली. हरमनप्रीत कौरच्या या शतकाला मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्सच्या 59 धावांच्या खेळीची जोड लाभली. त्यामुळंच भारतीय महिला संघानं या सामन्यात भारतानं वीस षटकांत पाच बाद 194 धावांची मजल मारली.

त्या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी रचली. हरमनप्रीतनं 51 चेंडूंत सात चौकार आणि आठ षटकारांसह 103 धावांची खेळी उभारली. जेमिमानं 59 धावांची खेळी सात चौकारांनी सजवली. महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात अर्धशतक ठोकणारी सर्वात तरुण फलंदाज हा मान आता जेमिमाच्या नावावर झाला.
आणखी वाचा























