एक्स्प्लोर
भारत आणि विंडीज जमैकात भिडणार, मुरली विजय संघाबाहेर
जमैका : विराट कोहलीच्या टीम इंडियाने अँटिगाच्या पहिल्या कसोटीवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. शिखर धवन, विराट कोहली आणि रवीचंद्रन अश्विन यांच्या जात्यात वेस्ट इंडिजचं आक्रमण भरडून निघालं. अँटिगाच्या त्या अपयशातून धडा घेऊन जेसन होल्डरची कॅरेबियन आर्मी जमैका कसोटीसाठी सज्ज झाली आहे. जमैकाच्या रणांगणात टीम इंडियासमोर वेगाचं आव्हान उभं करण्याचा त्यांची रणनीती आहे.
अँटिगाच्या संथ खेळपट्टीवर विंडीज फलंदाजांनी अश्विनच्या ऑफ स्पिनसमोर चक्क लोटांगण घातलं. विराट कोहलीच्या भारतीय संघाने या कसोटीत एक डाव आणि 92 धावांनी दणदणीत विजय साजरा केला.
अँटिगाच्या त्या लाजिरवाण्या पराभवाने पेटून उठलेल्या वेस्ट इंडिजने दुसऱ्या कसोटीत त्या पराभवाचा बदला घेण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी विंडीजने टीम इंडियाला जमैकात ग्रीन टॉपवर खेळण्याचं निमंत्रण दिलं आहे.
जमैकाच्या या ग्रीन टॉपवर भारतीय फलंदाजांची भंबेरी उडवण्याचा विंडीजचा इदारा पक्का आहे. अँटिगाच्या संथ खेळपट्टीवरही शॅनॉन गॅब्रियलच्या वेगाचा डंख मुरली विजयला बसला होता. त्यातून तो अजूनही सावरला नसल्याचं वृत्त आहे. दुखापतीमुळे मुरली विजयला या कसोटीला मुकावं लागणार आहे. आता ग्रीन टॉपवर गॅब्रियलच्या साथीने मिगेल कमिन्स किंवा अल्झारी जोसेफसारखी तरणीबांड वेगवान अस्त्रं भारतीय फलंदाजांच्या अंगावर सोडण्याची कूटनीती विंडीजने आखली आहे. त्याशिवाय कर्णधार जेसन होल्डर आणि कार्लोस ब्रॅथवेट यांचा मध्यमगती माराही विंडीजच्या ताफ्यात आहे.
जमैकाच्या ग्रीन टॉपवर भारतीय फलंदाजांची अग्निपरीक्षा घेण्याचा विंडीजचा प्रयत्न असेल, तर ईशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी हे भारताचं वेगवान त्रिकूटही काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत. विंडीजची वेगवान चौकडी जर शेर असेल, तर आजची टीम इंडियाही शेरास सव्वाशेर आहे.
थोडक्यात सांगायचं, तर जमैकाच्या ग्रीन टॉपवर वेगाचा मुकाबला वेगाने, आगीचा सामना आगीने होणार आहे. त्या मुकाबल्यात दोन्ही संघांचे फलंदाज कदाचित भाजून निघतील. कदाचित एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागेल. पण या अग्निपरीक्षेला सामोरं जाण्याची हिंमत ज्या फलंदाजांची फळी दाखवेल, त्याच फलंदाजांचा संघ जमैका कसोटीवर वर्चस्व गाजवेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement