IND Vs RSA 2nd Test : मालिकेत बरोबरी करण्यासाठी टीम इंडिया उतरणार मैदानात, प्लेइंग 11 मध्ये करणार मोठे बदल?
IND Vs RSA 2nd Test : दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भारत-आफ्रिकेदरम्यान खेळवण्यात येत असलेली कसोटी मालिका केवळ 2 सामन्यांचीच आहे. त्यामुळे आजपासून सुरु होणारा कसोटी सामना भारतासाठी महत्वपूर्ण असणार आहे.
IND Vs RSA 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळवण्यात येत असलेल्या कसोटी मालिकेतील 2 सामना आजपासून खेळवण्यात येणार आहे. हा सामना केपटाऊनच्या मैदानावर खेळवला जाईल. पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने टीम इंडिया (Team India) मैदानात उतरणार आहे. दरम्यान, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भारत-आफ्रिकेदरम्यान (IND Vs RSA 2nd Test) खेळवण्यात येत असलेली कसोटी मालिका केवळ 2 सामन्यांचीच आहे. त्यामुळे आजपासून सुरु होणारा कसोटी सामना भारतासाठी महत्वपूर्ण असणार आहे.
प्रसिद्ध कृष्णा प्लेईंग 11 मधून बाहेर होऊ शकतो
भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) याला दुसऱ्या कसोटीसाठी संधी दिली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यातून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, पहिल्या सामन्यात तो अपयशी ठरलाय. मात्र, कर्णधार रोहित शर्माने त्याला आणखी संधी देण्यात येईल, असे म्हटले होते. त्यामुळे प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात येईल की, तो दुसऱ्या सामन्यात त्याला बाहेर बसावे लागेल? हे नाणेफेक झाल्यानंतरच समजणार आहे.
रवींद्र जाडेजा पुनरागमन करणार?
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) फिट झाला असून तो आजपासून सुरु होणाऱ्या कसोटीसाठी उपलब्ध आहे. टीम इंडियासाठी ही चांगली बाब आहे. जाडेजाला टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते. रवींद्र जाडेजा रविचंद्रन अश्विनच्या(Ravichandran Ashwin) जागी मैदानात उतरु शकतो. अश्विनला पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी करता आली नव्हती, त्यामुळे त्याच्या जागी जाडेजाला संधी मिळू शकते.
केपटाऊनमध्ये एकही कसोटी जिंकू शकलेला नाही भारत
केपटाऊनच्या मैदानावर (Cape Town) भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 सामने खेळले आहेत. यातील 4 सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर 2 अनिर्णयीत राहिले आहेत. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनच्या मैदानावर 1993 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. हा सामना अर्निणयीत राहिला होता. यानंतर 1997 मध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताला 282 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. शिवाय, 2007 मध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने 5 गडी राखून विजय मिळवला होता. तर 2011 मध्ये खेळवण्यात आलेला सामना अनिर्णयीत राहिला होता. यानंतर 2018 आणि 2022 मध्ये झालेल्या सामन्यांमध्ये टीम इंडिया पराभूत झाली होती. आता पुन्हा एकदा केपटाऊनच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने-सामने असणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या