Ind vs Eng | टी20 क्रिकेट संघात अश्विनला स्थान नाहीच? विराटच्या उत्तरानं वेधलं लक्ष
अश्विनच्या उपस्थितीबाबत विराटनं दिलेलं उत्तर पाहता टी20 संघामध्ये त्याच्या पुनरागमनाची चिन्हं धुसर असल्याची बाब काही अंशी समोर आली.
मुंबई : Ind vs Eng भारतीय क्रिकेट संघ आणि इंग्लंडच्या क्रिकेट संघामध्ये कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर आता टी20 क्रिकेट सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पूर्वीच संघात नेमकं कोणकोणत्या खेळाडूंना स्थान दिलं जाणार याबाबतची उत्सुकता पाहायला मिळाली.
कसोटी मालिकेमध्ये तब्बल 32 गडी बाद करणाऱ्या रविचंद्रन अश्विनला संघात स्थान मिळावं अशी अपेक्षा क्रीडा रसिकांनी व्यक्त केली. पण, असं असूनही ही अपेक्षा पूर्ण होऊ शकलेली नाही. भारतीय संघाचं कर्णधारपद भुषवणाऱ्या विराट कोहली यानं अश्विनसाठी निर्धारित षटकांच्या सामन्यांसाठीच्या संघात परतण्याची संधी आणखी धुसर झाल्याचीच बाब आपल्या वक्तव्यातून अनपेक्षितपणे अधोरेखित केल्याचं पाहायला मिळालं.
वॉशिंग्टन सुंदरच्या सातत्यपूर्ण चांगल्या प्रदर्शनामुळं अश्विनला निर्धारित षटकांसाठीच्या संघात स्थान देण्यात आलेलं नाही. 'वॉशिंग्टन चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळं एकाच धाटणीचे दोन खेळाडू संघात सहभागी होऊ शकत नाहीत. त्यामुळं सुंदरचं प्रदर्शन अगदीच ढासळलं तरंच अश्विनला संघात स्थान देण्यात येईल', असं विराट म्हणाला.
अश्विनबाबतच्या या प्रश्नावर विराटनं नाराजीचा सूरही आळवला. प्रश्न विचारण्यापूर्वी त्याबाबत काही अंदाजही असायला हवा. तुम्हीच सांगा अश्विनला मी संघात कुठं ठेवू, संघात त्याच्यासाठी स्थान कुठे आहे. संघात यापूर्वीच वॉशिंग्टन सुंदर आहे. प्रश्न विचारणं सोपं आहे पण, त्यापूर्वी परिस्थितीचा अंदाजही असणं गरजेचं आहे, अशी स्पष्ट भूमिका त्यानं मांडली.
वरुण चक्रवर्तीच्या फिटनेसवरही विराटची नाराजी
फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती अनफिट असल्यामुळं विराटनं नाराजी व्यक्त केली. योयो चाचणीमध्ये अपयशी ठरल्यामुळं त्याला संघात स्थान देता आलं नसल्याचं त्यानं सांगितलं. भारतीय क्रिकेट संघासाठी आम्ही एक व्यवस्था निर्माण केली आहे. आम्ही आशा करतो की, याचं सर्वांकडूनच पालन केलं जाईल. यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं विराट म्हणाला.
गेल्या काही काळापासून फिरकी गोलंदाज चक्रवर्ती फिटनेसमुळं काही अडचणींचा सामना करत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही त्याची निवड करण्यात आली होती. पण, पुढ त्यानं खांद्याच्या दुखापतीबाबत माहिती न दिल्याची बाब समोर आली होती.