IND Vs AUS 4th Score Updates | पावसामुळं दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला; जाणून घ्या भारताची आतापर्यंतची धावसंख्या
IND Vs AUS 4th Test : पावसामुळं ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या आणि निर्णयक कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसातील अखेरचं सत्र रद्द करण्यात आलं.
IND Vs AUS 4th Test यजमान ऑस्ट्रेलियाला 369 धावांवर रोखल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शुभमन गिलला कमिन्सनं स्वस्तात माघारी पाठवलं. तर दुसरीकडे चांगला खेळ करत असतानाच नॅथन लायनच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारुन रोहित शर्मा झेलबाद झाला.
रोहित शर्मानं 6 चौकारांच्या मदतीन 44 धावा केल्या. रोहित आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी फलंदाजी करत भारतीय संघाचा डाव सावरला. चहापनापर्यंत भारतीय संघानं दोन गड्यांच्या मोबदतल्यात 62 धावा केल्या. ज्यानंतर पावसामुळं दुसऱ्या दिवसातील खेळात व्यत्यय येण्यास सुरुवात झाली.
दरम्यान, चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अखेर वरुणराजाच्या उपस्थितीमुळं दुसऱ्या दिवसातील अखेरचं सत्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Update: Play on Day 2 has been abandoned due to wet outfield. Play on Day 3 will resume at 9.30AM local time. #AUSvIND pic.twitter.com/dN2bt53lcf
— BCCI (@BCCI) January 16, 2021
दरम्यान, रविवारी हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरु होणार आहे, तर भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सुरु होणार आहे. पावसामुळं व्यत्यय आल्याकारणी दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघातील अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा अनुक्रमे 2 आणि 8 धावांसह खेळपट्टीवर उपस्थित होते.
चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली त्यावेळ ऑस्ट्रेलियाचा संघ भक्कम स्थितीत दिसत होता. पण, पहिल्याच तासाच संघानं दोन गडी गमावले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. त्यामागोमागत उर्वरित खेळाडूंनाही फार काळ खेळपट्टीवर तग धरता आला नाही. अखेर हेजलवूडही तंबूत परतला आणि ऑस्ट्रेलियाची पहिली खेळी सर्वबाद 369 धावांवर येऊन थांबली.