(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bahrain Grand Prix मध्ये फॉर्म्युला वनचा प्रसिद्ध ड्रायव्हर रोमेन ग्रोझीनच्या कारला भीषण अपघात
Bahrain Grand Prix : फॉर्म्युला वनचा प्रसिद्ध ड्रायव्हर रोमेन ग्रोझीनच्या कारला भीषण अपघात झाला आहे.
बहरैन ग्रँड प्रिक्स (Bahrain Grand Prix) मध्ये फॉर्म्युला वनचा ड्रायव्हर रोमेन ग्रोझीन याचा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर कारला आग लागली. यामुळे शर्यत थांबवण्यात आली. रोमेन वेळीच बाहेर पडल्याने तो थोडक्यात वाचला आहे.
34 वर्षीय फ्रेंच ड्रायव्हर ग्रोझीनचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरुन उतरली आणि आगीचा भडका उडाला. कारचं मागील चाक अडथळ्याला धडकल्याने कारला आग लागली, अशी माहिती मिळत आहे.
हास संघाचे अधिकारी गुंथर स्टेनरने स्काई स्पोर्ट्सला सांगितले, की ग्रोझीन व्यवस्थित आहे, त्याच्या हातात आणि पंजामध्ये किंचित जळजळ होत आहे. त्याच्या आवश्यक तपासण्या करण्यात आल्या आहेत. हास टीमने ट्विटरद्वारे सांगितले की, “रोमेनला खबरदारी म्हणून आणि पुढील वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.”
मेडिकल कारचालक अॅलन व्हॅन डेर मेरवे यांनी स्काय स्पोर्ट्सला सांगितले की, "मी 12 वर्षांत अशी आगीची घटना कधीही पाहिली नव्हती. रोमेनने स्वत:ची गाडीतून सुटका केली. मात्र, अशा घटनांमध्ये सुरक्षित बाहेर येणे ही गोष्ट आश्चर्यकारक असल्याचेही ते म्हणाले.