(Source: ECI/ABP News/ABP Majha)
FIFA World Cup : PM मोदींकडून अर्जेंटिनाचे अभिनंदन, म्हणाले - मेस्सीचे लाखो भारतीय चाहते विजयाने खूश, खर्गे-राहुल गांधींचीही प्रतिक्रिया
FIFA World Cup : पंतप्रधान मोदी म्हणाले की, अर्जेंटिना आणि मेस्सीचे कोट्यवधी भारतीय चाहते या विजयाने खूश आहेत
PM Modi Reaction On FIFA World Cup Final : कतार येथे झालेल्या फिफा विश्वचषक फायनलमध्ये (FIFA World Cup 2022) अर्जेंटिनाने (Argentina) फ्रान्सचा (France) पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव केला. तसेच अर्जेंटिनाने 1978 आणि 1986 नंतर तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. फिफा विश्वचषक चॅम्पियन झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी अर्जेंटिनाचे अभिनंदन केले. हा अंतिम सामना फुटबॉलमधील सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक म्हणून लक्षात राहील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
"मेस्सीचे कोट्यवधी भारतीय चाहते या विजयाने खूश"
पंतप्रधान मोदी म्हणाले की, अर्जेंटिना आणि मेस्सीचे कोट्यवधी भारतीय चाहते या महान विजयाने खूश आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, "हा आतापर्यंतचा सर्वात रोमांचक फुटबॉल सामना म्हणून लक्षात ठेवला जाईल! फिफा विश्वचषक चॅम्पियन बनल्याबद्दल अर्जेंटिनाचे अभिनंदन! त्यांनी संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. अर्जेंटिना आणि मेस्सीचे लाखो भारतीय चाहते आहेत. तसेच हा विजय साजरा करत आहे." यासोबतच पंतप्रधान मोदींनी फ्रान्सच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दलही त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, फिफा विश्वचषकातील उत्साही कामगिरीबद्दल फ्रान्सचेही अभिनंदन. त्यांनी आपल्या कौशल्याने आणि खेळाडू वृत्तीने फुटबॉल चाहत्यांची मने जिंकली.
This will be remembered as one of the most thrilling Football matches! Congrats to Argentina on becoming #FIFAWorldCup Champions! They’ve played brilliantly through the tournament. Millions of Indian fans of Argentina and Messi rejoice in the magnificent victory! @alferdez
— Narendra Modi (@narendramodi) December 18, 2022
मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींकडून अभिनंदन
फिफा विश्वचषक फायनलमधील रोमहर्षक विजयाबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अर्जेंटिनाचे अभिनंदन केले. राहुल गांधी म्हणाले की, या सामन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले की, खेळ दोन देशांना कसे एकत्र आणतात. काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनीही शानदार कामगिरी केल्याबद्दल आणि फिफा विश्वचषक चॅम्पियन बनल्याबद्दल अर्जेंटिनाचे अभिनंदन केले. मेस्सीचा शानदार खेळ लाखो चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा ठरला, असे खर्गे यांनी ट्विट केले. तर, राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणाले, किती सुंदर खेळ! रोमहर्षक विजयाबद्दल अर्जेंटिनाचे अभिनंदन. फ्रान्सनेही चांगला खेळ केला. मेस्सी आणि एमबाप्पे दोघेही खऱ्या चॅम्पियनसारखे खेळले! भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी आणि इतर लोकांनी 2022 चा FIFA विश्वचषक अंतिम सामना स्क्रीनवर पाहिला.
पश्चिम बंगालमध्ये अर्जेंटिनाच्या समर्थकांचा जल्लोष
कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या इतर भागांतील अर्जेंटिनाच्या समर्थकांनी फिफा विश्वचषक विजेतेपदाचा मुकुट मिळाल्याने आनंद व्यक्त केला. यावेळी समर्थकांनी फटाके फोडले आणि त्यांच्या आवडत्या संघाच्या निळ्या आणि पांढर्या जर्सीमध्ये अर्जेंटिनाचा राष्ट्रध्वज फडकावत विजय साजरा केला. विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये आपल्या आवडत्या संघाच्या विजयानंतर अर्जेंटिनाचे काही समर्थक एकमेकांना मिठी मारताना आणि मिठाई वाटताना दिसले.
इतर बातम्या