एक्स्प्लोर
यजमान रशिया 'फिफा विश्वचषका'वर नाव कोरणार का?
मायदेशातल्या विश्वचषकात रशिया आणखी कुठवर मजल मारणार याविषयी फुटबॉलरसिकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुंबई / मॉस्को : यंदाच्या फिफा विश्वचषकात रशियन क्रांती पाहायला मिळणार का, असा प्रश्न फुटबॉलच्या जाणकारांना पडला आहे. त्याचं कारण आहे रशियानं विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत मारलेली धडक. रशियानं स्पेनला पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवून तब्बल 48 वर्षांनी विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवलं आहे. त्यामुळे प्रतिष्ठेच्या विश्वचषकापासून रशिया आता तीनच पावलं दूर आहे. मायदेशातल्या विश्वचषकात रशिया आणखी कुठवर मजल मारणार याविषयी फुटबॉलरसिकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
रशियाचा कर्णधार इगोर अकिनफिव्हनं फिफा विश्वचषकात नवा इतिहास घडवला आहे. अकिनफिव्हनं आधी कोके आणि मग अस्पासची पेनल्टी थोपवून रशियाला स्पेनवर 4-3 असा सनसनाटी विजय मिळवून दिला. या विजयाने रशियाला तब्बल 48 वर्षांनंतर विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीचं दार खुलं झालं.
सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर रशियाची बाद फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ होती. इगोर अकिनफिव्हच्या पोलादी बचावानं रशियाला आणखी एक पाऊल पुढे टाकण्याची, म्हणजे स्पेनला हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची संधी मिळवून दिली. याआधी सोव्हिएत रशियानं 1970 साली विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याआधी 1966 साली सोव्हिएत रशियानं विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. पण त्यानंतर गेल्या 48 वर्षांत आधीच्या सोव्हिएत रशियाला किंवा विघटनानंतरच्या रशियाला विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नव्हती. ती कमाल इगोर अकिनफिव्हच्या रशियानं करुन दाखवली आहे.
व्लादिमीर पुतिन यांच्या रशियात यंदा पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. पण रशियाला 2018 सालच्या फिफा विश्वचषकाचं यजमानपद बहाल करण्यात आलं, त्यावेळी जगभरातल्या एकाही फुटबॉलरसिकाला वाटलं नसावं की, रशिया उपांत्यपूर्व फेरीत धडक मारेल. कारण रशियाचा तसा इतिहास नाही. पण अकिनफिव्हच्या नेतृत्त्वाखाली रशियानं स्पेनला हरवून तो चमत्कार घडवून आणला.
फिफा विश्वचषकातल्या या कामगिरीनं रशियात आता उत्साहाचं वातावरण निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण प्रत्यक्ष विश्वचषकाआधी रशियात ही परिस्थिती नव्हती. विश्वचषकाच्या पूर्वतयारीसाठी झालेल्या सात सामन्यांमध्ये रशियाला एकही विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे रशियाच्या पाठीराख्यांमध्ये आपल्या संघाच्या कामगिरीविषयी फारसा उत्साह नव्हता. पण रशियन संघानं लागोपाठ दोन विजय मिळवून, 1986 सालानंतर पहिल्यांदाच विश्वचषकाची बाद फेरी गाठली आणि त्यांच्या देशातलं सारं चित्रच पालटलं.
रशियाची विश्वचषकाच्या अ गटातली कामगिरी कशी होती? रशियानं सलामीच्या साखळी सामन्यात सौदी अरेबियाचा 5-0 असा धुव्वा उडवला. मग रशियानं दुसऱ्या सामन्यात इजिप्तचा 3-1 असा फडशा पाडला. रशियाला तिसऱ्या सामन्यात उरुग्वेकडून 0-3 अशी मानहानी स्वीकारावी लागली. पण पहिल्या दोन विजयांनी रशियाचं बाद फेरीचं तिकीट कन्फर्म झालं होतं.
रशियाचा 2018 सालच्या विश्वचषकाचा संघ हा आजवरचा त्यांचा सर्वोत्तम संघ समजला जातो. डेनिस चेरिशेव्ह, युरी गझिन्स्की, अलेक्झांडर गोलोविन, आर्टेम झ्युबा या शिलेदारांची कामगिरी प्रभावी ठरली आहे. 27 वर्षांच्या डेनिस चेरिशेव्हनं चार सामन्यांमध्ये मिळून सर्वाधिक तीन गोल झळकावले आहेत. आर्टेम झ्युबानंही चार सामन्यांमध्ये तीन गोल नोंदवून, लक्षवेधी कामगिरी बजावली आहे. त्याशिवाय युरी गझिन्स्की आणि अलेक्झांडर गोलोविनच्या खात्यातही एकेका गोलची नोंद झाली आहे.
रशियानं बाद फेरीचं तिकीट कन्फर्म केलं, त्यावेळी प्रशिक्षक स्टॅनिस्लाव चेर्चेसोव्ह म्हणाले होते की, ही रशियाची सर्वोत्तम कामगिरी नाही, तर रशियाची सर्वोत्तम कामगिरी आपल्याला अजून पाहायला मिळायची आहे. चेर्चेसोव्ह यांचा हा दावा कर्णधार अकिनफिव्ह आणि त्याची रशियन फौज आणखी कुठवर खरा ठरवणार, हे केवळ त्यांनाच ठाऊक असावं.
सोव्हिएत रशिया किंवा रशियाची फिफा विश्वचषकात खेळण्याची ही अकरावी वेळ आहे. पण आजवरच्या इतिहासात कोणत्याही रशियाला विश्वचषक पटकावायचं दूर, पण विश्वचषकाची अंतिम फेरीही गाठता आलेली नाही. 1966 सालच्या विश्वचषकात सोव्हिएत रशियानं उपांत्य फेरीत मारलेली धडक हीच रशियाची विश्वचषकातली आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे.
यंदाच्या विश्वचषकात रशियानं आजवरचा इतिहास बदलण्याचा जणू चंग बांधलेला दिसतो. त्यामुळे मायदेशातल्या विश्वचषकात रशिया आणखी किती सर्वोत्तम कामगिरी बजावतो, याविषयी जाणकारांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. फुटबॉलच्या इतिहासात यजमान राष्ट्रानं आजवर सहावेळा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. त्यात 1930 साली उरुग्वे, 1934 साली इटली, 1966 साली इंग्लंड, 1974 साली जर्मनी, तर 1978 साली अर्जेंटिनानं यजमान असताना फिफा विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला होता. यंदा रशियाचा संघ त्यांच्या पंक्तीत बसतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement